पाच दिवसांच्या अपहृत बाळाची पोलिसांनी केली गुजरातहून सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:11 AM2021-08-22T04:11:14+5:302021-08-22T04:11:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदाबाद : गर्भवती महिलांना हेरायचे. त्यांना मोठ्या रकमेचे आमिष दाखवून नवजात शिशूंची विक्री व तस्करी करायची. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदाबाद : गर्भवती महिलांना हेरायचे. त्यांना मोठ्या रकमेचे आमिष दाखवून नवजात शिशूंची विक्री व तस्करी करायची. यातून लाखो रुपये कमवायचे, असा व्यवसाय करणाऱ्या एका रॅकेटचा खेडा जिल्ह्यातील (गुजरात) पोलिसांनी भंडाफोड केला आहे. या घटनेत चार महिलांना अटक करण्यात आली असून, यात एका पाच दिवसांच्या ओल्या बाळंतिणीचाही समावेश आहे, हे विशेष !
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरातील (महाराष्ट्र) तीन महिलांच्या टोळीने एका गरीब कुटुंबातील गर्भवती महिलेला तिचे बाळ दीड लाख रुपयांत विकून देण्याचे आमिष दाखवून खेडा जिल्ह्यातील नाडियाड येथे आणले होते. पोलिसांना सुगावा लागताच त्यांनी सापळा रचला व नवजात बाळाची सुटका करून त्याच्या आईसह चारही महिलांना अटक केली. अटकेतील महिलांमध्ये नवजात बाळाची आई राधिका राहुल गेडाम, मोनिका महेश शाह, पुष्पा संदीप पटेलिया आणि माया लालजी दाबला यांचा समावेश आहे. खेडाच्या पोलीस अधीक्षक अर्पिता पटेल यांनी दिलेल्या महितीनुसार, नाडियाड येथील रॅकेटकडून बाळांची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून सापळा रचून एका पोलिसाला नकली ग्राहक बनवून चर्चेसाठी पाठविले. चर्चेत या आरोपी महिला बाळाला ६ लाख रुपयांत विकण्यास तयार झाल्या. पोलिसांनी तीन महिलांना अटक करून चौकशी आरंभली. बाळाला एका महिलेकडून खरेदी केले असून तिला प्रसूतीसाठी नागपुरातून नाडियाड येथे आणल्याचे त्यांनी सांगितले. या माहितीवरून एका हॉटेलमध्ये प्रसूतीसाठी मुक्कामी ठेवलेल्या बाळाच्या आईलाही पोलिसांनी अटक केली.
...
माया आहे महाराष्ट्रीयन
या महिला बाळाचा सौदा करू इच्छित होत्या, असे प्राथमिक चौकशीत पुढे आल्याचे पटेले यांनी सांगितले.
यातील माया नामक महिला रॅकेटची मास्टरमाइंड आहे. ती मूळची महाराष्ट्रातील नागपूरची रहिवासी असून, मागील अनेक वर्षांपासून नाडियाडमध्ये स्थायिक आहे. या महिलांविरोधात अनेक कलमांतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
...
यापूर्वी तीन मुलांना विकले !
या रॅकेटने आतापर्यंत तीन बाळांना विकल्याची धक्कादायक बाब चौकशीत पुढे आली आहे. या महिला फक्त गरीब महिलांनाच बाळाच्या विक्रीसाठी हेरतात की, त्यांच्याकडून गर्भधारणा करवून घेतात, याची माहिती पोलीस घेत आहेत. महिला आणि मुलांची डीएनए चाचणी करून याचा शोध घेतला जाणार आहे.
...