पोलिसांनी महिलांना दागिने केले परत
By admin | Published: June 7, 2017 02:06 AM2017-06-07T02:06:32+5:302017-06-07T02:06:32+5:30
विविध गुन्ह्याचा छडा लागल्यानंतर संबंधित फिर्यादीचा शोध घेऊन त्यांना त्यांचा मुद्देमाल परत करण्याची प्रशंसनीय कामगिरी
चोरीचा माल जप्त : सीताबर्डी पोलिसांची कामगिरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विविध गुन्ह्याचा छडा लागल्यानंतर संबंधित फिर्यादीचा शोध घेऊन त्यांना त्यांचा मुद्देमाल परत करण्याची प्रशंसनीय कामगिरी सीताबर्डी पोलिसांनी बजावली. अनेक पोलीस ठाण्यात उशिरा आरोपी पकडतात अन् त्यांच्याकडून चोरीचा मालही जप्त होतो. मात्र, प्रदीर्घ न्यायालयीन प्रक्रियेमुळे अनेकांना त्यांचा ऐवज मिळवण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो. हे ध्यानात घेत पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी प्रत्येक पोलीस ठाण्याला जप्त केलेला माल ज्यांचा त्यांना परत करण्यासाठी विशेष पथक तयार करण्याचे आदेश दिलेले आहे. त्यानुसार सीताबर्डी ठाण्यातील हवालदार प्रमोद मेश्राम (मुद्देमाल मोहरर), शिपाई सुरेंद्र शेंडे, प्रेमचंद पाटील, अमित केचे यांचे पथक नेमण्यात आले.
या पथकाने चेनस्नॅचिंगच्या गुन्ह्यातील फिर्यादी मंगला खुरसंगे (रा. झिंगाबाई टाकळी), कमला नारायणजी यादव (वय ६७, रा, रघुजीनगर, सक्करदरा) तसेच जयश्री अनंतकृष्ण अय्यर (वय ४७, रा. बजाजनगर) या तीन महिलांच्या सोनसाखळ्या तसेच जयेश वेलजीभाई कोठारी (रा. छोटी धंतोली) यांना त्यांची प्लेझर दुचाकी परत करण्यात आली. पोलीस आयुक्त व्यंकटेशम, सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे, परिमंडळ २ च्या उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त बोरावके यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी ही कामगिरी बजावली.
त्यांना सुखद धक्का
जयश्री अनंतकृष्ण अय्यर या सरस्वती विद्यालयात प्राध्यापक तर अन्य दोघी गृहिणी आहेत. आपले दागिने परत मिळाल्यानंतर या महिला खूपच आनंदीत झाल्या. आम्ही न्यायालयीन प्रक्रियेमुळे कंटाळलो होतो. त्यामुळे दागिन्यांची आसच सोडली होती. मात्र सीताबर्डी पोलिसांनी आम्हाला आमचे दागिने मिळवून दिल्याने पोलिसांबद्दल आम्हाला अतिव आदर निर्माण झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.