एनकुमार यांच्या शोधासाठी पोलिसांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 11:07 PM2019-08-20T23:07:37+5:302019-08-20T23:12:39+5:30

आयनॉक्स पूनम मॉल दुर्घटना प्रकरणी मॉलचे मालक एनकुमार यांच्या शोधासाठी पोलिसांनी धावपळ सुरु केली आहे.

Police rush to search for Nkumar | एनकुमार यांच्या शोधासाठी पोलिसांची धावपळ

एनकुमार यांच्या शोधासाठी पोलिसांची धावपळ

Next
ठळक मुद्देआयनॉक्स पूनम मॉल दुर्घटना : रासायनिक विश्लेषकांकडून तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आयनॉक्स पूनम मॉल दुर्घटना नेमकी कशी घडली, रसायन अथवा स्फोटके वापरली गेली का, त्याचा शोध घेण्यासाठी मंगळवारी रासायिनक विश्लेषक (सीए) सक्रिय झाले आहे. या पथकाने मंगळवारी मॉलला भेट देऊन जमीनदोस्त झालेल्या भागाची पाहणी, तपासणी केली. सुरक्षेच्या दृष्टीने तज्ज्ञांचे एक पथक पुन्हा बुधवारी येथे भेट देऊन नमुने गोळा करणार असल्याची माहिती आहे.
१६ ऑगस्टला रात्री पूनम मॉलचा सज्जा आणि भिंत कोसळून वृद्ध चौकीदार जयप्रकाश शर्मा यांचा मृत्यू झाला तर महिलेसह तिघे जबर जखमी झाले होते. लकडगंज पोलिसांनी या प्रकरणात मॉलचे मालक एनकुमार यांच्या आणि व्यवस्थापनाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. रविवारी एनकुमार यांच्या निवासस्थानी नोटीस चिपकवून त्यांना चौकशीसाठी ठाण्यात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, एनकुमार यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून, सोमवारी पोलिसांनी एनकुमार यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयात छापा घालून तपासणी केली. मात्र, त्यांचा कसलाही पत्ता लागला नाही.
रसायन किंवा स्फोटकांचा वापर करून ही दुर्घटना घडवून आणल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे मॉलमधील दुकानदार, परिसरातील व्यापारी, रहिवासी यांच्याकडे विचारपूस करून दुर्घटनेचे कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातून समाधानकारक माहिती मिळत नसल्याने पोलिसांनी सरकारी यंत्रणेकडूनच या प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढण्याचे प्रयत्न चालविले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका, नासुप्र आणि व्हीएनआयटीला पत्र पाठवून दुर्घटना घडवून आणली काय, त्यासाठी रसायन किंवा स्फोटकांचा वापर केला काय, याची चौकशी चालवली आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणांना पोलिसांनी मलब्याचे नमुने पाठविले असून, मॉलचा सज्जा आणि भिंत कोणत्या कारणामुळे पडली, त्याचा अहवाल मागितला आहे. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी रासायिनक विश्लेषकांच्या (सीए) पथकाने मंगळवारी मॉलला भेट देऊन जमीनदोस्त झालेल्या भागाची पाहणी केली. सुरक्षेच्या दृष्टीने तज्ज्ञांचे एक पथक पुन्हा बुधवारी येथे भेट देऊन नमुने गोळा करणार असल्याची माहिती आहे. मॉलच्या दुर्घटनेने शहरभर उलटसुलट चर्चेचे मोहोळ उडवल्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाला गंभीरपणे घेतले. त्यामुळे हे प्रकरण एनकुमार यांना आणि मॉल प्रशासनासाठी अडचणीचे ठरले आहे. पोलीस त्यांचा जागोजागी शोध घेत आहेत.

अटकपूर्व जामिनासाठी अर्ज             

वर्धमाननगरमधील पूनम मॉल अपघात प्रकरणात दाखल गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी मॉलचे मालक एन. कुमार हिरचंदानी यांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
 

Web Title: Police rush to search for Nkumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.