पोलिसांनी लावले मॅकडोनल्डला सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:10 AM2021-03-16T04:10:04+5:302021-03-16T04:10:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढे येण्याऐवजी संसर्गाचा धोका निर्माण करणाऱ्या शहरातील हाॅटेल, रेस्टॉरेंटसह अनेक आस्थापनांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढे येण्याऐवजी संसर्गाचा धोका निर्माण करणाऱ्या शहरातील हाॅटेल, रेस्टॉरेंटसह अनेक आस्थापनांना परिमंडळ दोनच्या उपायुक्त विनीता साहू यांनी रविवारी रात्री जोरदार चपराक हाणली. मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे साहू यांनी स्वत:च सदरमधील मॅकडोनल्ड रेस्टॉरेंटमध्ये धडक देऊन त्याला सील लावले. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी आणि झपाट्याने वाढणाऱ्या बाधितांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी शासन प्रशासनाने काही नियम घालून दिले आहेत. विविध प्रकारच्या आस्थापना, हॉटेल्स, रेस्टॉरेंटना खाद्यपदार्थाची ऑनलाईन डिलिव्हरी देण्यास मुभा दिली आहे. मात्र, सदरमधील पूनम चेंबरमध्ये असलेल्या मॅकडोनल्ड रेस्टॉरेंटमध्ये सर्रास ग्राहकांची गर्दी जमवून त्यांना खाद्यपदार्थ दिले जात असल्याची आणि तेथे मोठी गर्दी उसळल्याची माहिती डीसीपी साहू यांना रविवारी रात्री ९ च्या सुमारास मिळाली. त्यामुळे शहानिशा करण्यासाठी त्यांनी स्वत:च तेथे धडक दिली. यावेळी खवय्यांची मोठी गर्दी तेथे आढळली. कुणाला कारमध्ये तर कुणाला रस्त्यावर खाद्यपदार्थ दिले जात असल्याचे पाहून डीसीपी साहू यांनी पोलिसांना तेथे बोलवून घेतले आणि मॅकडोनल्डचा व्यवस्थापक अभिषेक पांडे (वय २६) याची चांगलीच खरडपट्टी काढली. त्याच्यासह योगेश रवींद्र पाटणे (वय २२), देवेंद्र गोवर्धन रहांगडाले (वय २०), मयूर धर्मराज गाैरकर, अक्षय जितेंद्र कांबळे आणि अजित विलास भोयर यांच्याविरुद्ध राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग प्रतिबंधक कायदा आणि मुंबई पोलीस कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून मॅकडोनल्डला सील लावले.
----
डॉमिनोज आणि रसकुंजवरही बडगा
या कारवाईनंतर साहू यांनी सदरमधील डॉमिनोज पिझ्झा आणि रसकुंजच्या व्यवस्थापनावरही निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ आस्थापना सुरू ठेवल्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. या तीनही ठिकाणी सहायक निरीक्षक देवीदास चोपडे, शिपाई राजेश्वर ढोबळे, आशिष वानखेडे यांचा कारवाईत सहभाग होता.
----