भंडाऱ्याच्या बडतर्फ पोलिसाने सासरच्या दुचाक्या पेटविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:25 AM2020-12-14T04:25:17+5:302020-12-14T04:25:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - भंडाऱ्याच्या बडतर्फ पोलिसाने बायको नांदायला येत नसल्याने मेव्हण्याच्या घरी येऊन त्याच्या दोन दुचाक्या पेटवून ...

Police set fire to his father-in-law's two-wheeler near the store | भंडाऱ्याच्या बडतर्फ पोलिसाने सासरच्या दुचाक्या पेटविल्या

भंडाऱ्याच्या बडतर्फ पोलिसाने सासरच्या दुचाक्या पेटविल्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - भंडाऱ्याच्या बडतर्फ पोलिसाने बायको नांदायला येत नसल्याने मेव्हण्याच्या घरी येऊन त्याच्या दोन दुचाक्या पेटवून दिल्या. ‘वड्याचे तेल वांग्यावर’ या म्हणीचा प्रत्यय देणारी ही घटना शुक्रवारी मध्यरात्री अजनीत घडली.

नीलेश योगेश हेडावू (वय ४०) असे आरोपीचे नाव आहे. तो तकिया वाॅर्ड भंडारा येथील रहिवासी आहे. नीलेश गोंदीया पोलीस दलात कार्यरत होता. कर्तव्यात कसूर केल्याने त्याला पोलीस दलातून निष्कासित करण्यात आले. त्यानंतर तो अट्टल बेवडा बनला. दारूच्या नशेत पत्नी आणि दोन मुलांना छळत असल्याने त्याचे कुटुंबीयांसोबत पटेनासे झाले. त्यामुळे त्याची पत्नी मनिषा (वय ३५)आपल्या दोन मुलांसह नागपुरात माहेरी येऊन बसली.

मनिषाच्या आईचे घर अजनीच्या विणकर वसाहतीत आहे. तिने परत नांदायला यावे म्हणून नीलेशने वारंवार प्रयत्न केले. मात्र, दारुड्या नवऱ्याकडे जाण्याऐवजी मिळेल तो रोजगार करून मुलांचा सांभाळ करण्याची मानसिकता बनविलेल्या मनिषाने त्याला दाद दिली नाही. यावरून दोघांचे मनिषाच्या माहेरीही अनेकदा वाद झाला. पत्नी ऐकायला तयार नसल्याने संतापलेला नीलेश शुक्रवारी दुपारी सासरी आला. तू माझ्यासोबत आली नाही तर गंभीर परिणाम होतील, अशी त्याने पत्नीला धमकी दिली. मनिषासह सासरच्या मंडळींनीही त्याला दाद न देता हुसकावून लावले. त्यावेळी तो निघून गेला. मध्यरात्री नीलेशने पुन्हा मनिषाचे माहेर गाठले. त्याने मनिषाच्या भावाची पल्सर आणि वहिणीची मॅस्ट्रो दुचाकी पेटवून दिली.

तो हात शेकत होता

घरासमोर आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर मनिषाच्या माहेरची मंडळी बाहेर धावत आली. जळत्या दुचाकीजवळ आरोपी नीलेश हात शेकत उभा होता. ते पाहून मनिषाच्या माहेरच्या मंडळीने त्याच्याकडे धाव घेतली. मात्र, तो पळून गेला. मनिषाने दिलेल्या तक्रारीवरून अजनीचे पोलीस हवलदार सुनील तिडके यांनी आरोपी नीलेशविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.

---

Web Title: Police set fire to his father-in-law's two-wheeler near the store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.