नागपूर जिल्ह्यातील मांडवीत दारुमाफियांचा पोलीस पथकावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 11:36 PM2019-09-10T23:36:52+5:302019-09-10T23:40:20+5:30
सावनेर तालुक्यातील मांडवी या पारधी बेड्यात सुरु असलेल्या दारूच्या अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर दारुमाफियांकडून हल्ला करण्यात आला. मंगळवारी सकाळी ७.३० च्या सुमारास ही घटना घडली.
नागपूर (सावनेर) : सावनेर तालुक्यातील मांडवी या पारधी बेड्यात सुरु असलेल्या दारूच्या अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर दारुमाफियांकडून हल्ला करण्यात आला. मंगळवारी सकाळी ७.३० च्या सुमारास ही घटना घडली.
सावनेर तालुक्यातील मांडवी येथील पारधी बेड्यात मोहाची दारुनिर्मिती आणि विक्री केली जाते. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार सावनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सरबलकर पथकासह येथे कारवाई करण्यासाठी पोहोचले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी मुख्य आरोपी रेविसलाल चव्हाण (३२) याच्या घराची चौकशी केली असता तो भडकला. यानंतर चव्हाण याने वस्तीतील साथीदारांना येथे बोलावून घेतले. ते मिरची पावडर आणि लाठ्या घेऊन तिथे पोहोचले. यातील काही लोकांनी पोलीस पथकावर हल्ला केला. यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नरेंद्र गौरखेडे गंभीर जखमी झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी सबलकर, पोलीस कर्मचारी महेश बिसने, सुशील खोब्रागडे आणि पोलीस पाटील सतीश जलीत हेही या हल्ल्यात जखमी झाले. येथे परिस्थिती चिघळल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस कुमक मागविण्यात आली. यानंतर पोलीस बंदोबस्तात येथील दारुभट्या आणि शेकडो लिटर मोहाची दारू नष्ट करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी रेविसलाल सुजीराम चव्हाण (३२),अमर जेवरसिंह चव्हाण (३०), शैलेंद्र लक्ष्मण राजपूत (२६), संतोष कीर्तीसिंह चव्हाण (३०), आयसलाल रामस्वरूप राजपूत (३०), दीपा हीरा ऊर्फ माहुल राजपूत (३५),अलोमा भोसले (२५),रेविसलाबाई अजय राजपूत (३८),आयरूला घमेरसिंह चव्हाण (३३) यांना अटक केली. पोलीस निरीक्षक मनीष दुबे यांच्या तक्रारीवर आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.