नागपुरात रेल रोको करणाऱ्या विदर्भवाद्यांना पोलिसांनी गेटवरच रोखले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 08:40 PM2020-02-25T20:40:07+5:302020-02-25T20:44:33+5:30

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने मंगळवारी रेल रोको आंदोलन पुकारले होते. यासाठी विदर्भवादी आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने मनीषनगर रेल्वे गेटजवळ पोहोचले. परंतु त्यांना पोलिसांनी रोखले.

Police stop the Vidarbhawadi at gate who block the railway in Nagpur! | नागपुरात रेल रोको करणाऱ्या विदर्भवाद्यांना पोलिसांनी गेटवरच रोखले!

नागपुरात रेल रोको करणाऱ्या विदर्भवाद्यांना पोलिसांनी गेटवरच रोखले!

Next
ठळक मुद्देशेकडोंचा सहभाग : पोलिसांनी आंदोलन दडपल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने मंगळवारी रेल रोको आंदोलन पुकारले होते. यासाठी विदर्भवादी आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने मनीषनगर रेल्वे गेटजवळ पोहोचले. परंतु त्यांना पोलिसांनी रोखले. आंदोलनकर्ते मानायला तयार नव्हते. यामुळे काही वेळ गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी शेकडो विदर्भवाद्यांना ताब्यात घेतले. दरम्यान पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा व महिलांसोबत धक्काबुक्की केल्याचा आरोप समितीने केला आहे.


स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी समितीतर्फे विविध टप्प्यात आंदोलन सुरु आहे. याअंतर्गत मनीषनगर येथील रेल्वे गेटजवळ रेल्वे रोको आंदोलन करण्यासाठी मंगळवारी दुपारी जय विदर्भाच्या घोषणा देत शेकडो विदर्भवादी पोहोचले. समितीचे नेते अ‍ॅड. वामनराव चटप, संयोजक राम नेवले यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते रेल्वे ट्रॅककडे जायला निघाले. परंतु पोलिसांचा आधीच तगडा बंदोबस्त होता. त्यांनी आंदोलनकर्त्यांना रोखून धरले. पोलिसांनी बल प्रयोग केल्याचा आरोप समितीने केला आहे. अनेक महिला व पुरुष या दरम्यान झालेल्या धक्काबुुक्कीमुळे खाली पडल्याचे समितीचे म्हणणे आहे. जवळपास ३०० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोनेगाव पोलीस ठाण्यात नेले. नंतर सर्वांना मुक्त करण्यात आले.

या आंदोलनात समितीच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष रंजना मामर्डे, मुकेश मासुरकर, राजेंद्र आगरकर, रवींद्र भामोड़े, दिलीप भोयर, नीळूू यावलकर, पुरुषोत्तम पाटील, कृष्णा भोंगाडे, सुनील वडस्कर, वृषभ वानखेड़े, नीलेश पेठे, अरुण मुनघाटे, रमेश उप्पलवार, माधवराव गावंडे, सुनील साबळे, ऊषा लांबट, प्रीति देडमुठे, ज्योति खांडेकर, माधुरी चव्हाण, प्रणाली तवाने, राजेंद्रसिंग ठाकुर, रेखा निमजे, रजनी शुक्ला, विजय आगबत्तलवार, देवीदास लांजेवार, सुखदेव पत्रे, किशोर पोतनवार विजय मौंदेकर, ग्यानचंद सहारे, मधुकर कोवे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

भाजपने करावी आश्वासनाची पूर्ती
पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना सोनेगाव पोलीस ठाण्यात आणले. येथे मुख्य संयोजक राम नेवले यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, राज्याची निर्मिती करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचा आहे. त्यामुळे रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. भाजपने स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्याचे आश्वासन दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता ते आश्वासन पूर्ण करायला हवे. भाजप एकामागोमाग राज्याची सत्ता गमावत आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य न दिल्यास येथेही भाजपची स्थिती खराब होण्याची शक्यताही नेवले यांनी वर्तविली.

आंदोलन आणखी तीव्र करू
यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला. स्वतंत्र राज्य होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. १ मे रोजी विदर्भ बंदचे आवाहन करण्यात आले. यावेळी विजेचे दर कमी करण्यात यावे आणि कृषी पंपाचे लोडशेडिंग बंद करण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली.

Web Title: Police stop the Vidarbhawadi at gate who block the railway in Nagpur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.