राज्य गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:08 AM2021-01-25T04:08:04+5:302021-01-25T04:08:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्याला गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी पोलीस दल प्रयत्नशील आहे, असे राज्याचे नवनियुक्त पोलीस महासंचालक (डीजीपी) ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्याला गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी पोलीस दल प्रयत्नशील आहे, असे राज्याचे नवनियुक्त पोलीस महासंचालक (डीजीपी) हेमंत नगराळे म्हणाले. पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते शनिवारी पहिल्यांदाच नागपुरात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख-चर्चा करून घेतल्यानंतर त्यांनी पोलीस जिमखान्यात पत्रकारांशी अनाैपचारिक संवाद साधला.
ते म्हणाले, सराईत गुन्हेगारांविरूद्ध कठोर कारवाई केल्यास गुन्हे नियंत्रणात येतील, असा आपल्याला विश्वास आहे. त्यामुळे यापुढे राज्यात टार्गेट बेस पुलिसिंगवर भर देण्यात येईल. तडीपार गुंड सर्वाधिक गुन्हेगारीत सक्रिय असल्याचे दिसून येते. त्यामुळे तडीपार गुंड कुठे आहेत. तडीपारी संपून परतलेले सध्या काय करीत आहेत, याची खडानखडा माहिती घेण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तडीपार तसेच तीनपेक्षा अधिक शारीरिक दुखापतीचे गुन्हे दाखल असलेल्या गुंडांची यादी तयार करण्यात येईल. वारंवार गुन्हे करणाऱ्या गुंड व त्यांच्या टोळींविरूद्ध, तडीपार, स्थानबद्ध, मकोकासारखी कडक कारवाई करण्यात येईल. अशा गुंडांच्या प्रत्येक हालचालींची रोज माहिती घेण्याचे ‘टार्गेट’ पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त दर आठवड्याला या गुंडांबाबत इत्यंभूत माहिती घेऊन त्याचा अहवाल दर महिन्याला पोलीस आयुक्तांसह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करतील, असेही सांगण्यात आले आहे. या अहवालाच्या आधारावर त्या गुन्हेगारावर पुन्हा कोणती कडक कारवाई करायची, ते निश्चित केले जाणार आहे.
कन्विक्शन रेट वाढविणार
अनेक प्रकरणात साक्षीदार किंवा तक्रारदार फितूर होतात. त्यामुळे गुन्ह्यात शिक्षेचे प्रमाण कमी आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी साक्षीदार व तक्रारदार फितूर होऊ नये, याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. याशिवाय दोषसिद्धतेसाठी वैज्ञानिक पुरावाच्याही आधार घेतला जाईल. यातून कन्विक्शन रेट वाढवण्यावर भर दिला जाईल, असे नगराळे म्हणाले.
रिक्त जागी लवकरच नियुक्ती
राज्यात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे दोन लाखांपेक्षा जास्त आहेत. त्यापैकी सुमारे २० हजार पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर अधिकारी व अमलदारांची नियुक्ती करण्यासाठी आपण मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना विनंती करणार आहोत. नागपुरात रिक्त असलेले सहपोलीस आयुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्तांचेही पद लवकरच भरले जाईल, अशी ग्वाही पोलीस महासंचालक नगराळे यांनी दिली.