आयुक्तांचा पोलीस बदली दरबार : अनेकांना पसंतीनुसार नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 12:25 AM2020-09-20T00:25:23+5:302020-09-20T00:27:53+5:30
शहर पोलीस दलातील ५२४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज अनोख्या पद्धतीने पार पाडली. बदलीच्या प्रक्रियेसाठी त्यांनी जिमखान्यात चक्क पोलीस दरबार भरविला आणि प्रत्येकाला कोणत्या ठिकाणी बदली पाहिजे, असे विचारून बहुतांश जणांना त्यांच्या इच्छेनुसार त्या त्या ठिकाणी नियुक्ती दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर पोलीस दलातील ५२४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज अनोख्या पद्धतीने पार पाडली. बदलीच्या प्रक्रियेसाठी त्यांनी जिमखान्यात चक्क पोलीस दरबार भरविला आणि प्रत्येकाला कोणत्या ठिकाणी बदली पाहिजे, असे विचारून बहुतांश जणांना त्यांच्या इच्छेनुसार त्या त्या ठिकाणी नियुक्ती दिली.
शहर पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी पारदर्शी प्रक्रिया पार पडली आहे.
पोलीस शिपाई, नायक, हवालदार आणि सहायक फौजदार या पदावर काम करणाºया पोलिसांना एका ठिकाणी जास्तीत जास्त पाच वर्ष सेवा देता येते. त्यानंतर त्यांची बदली केली जाते. मात्र मलईचे स्थान मिळाल्यामुळे बदली होऊनही अनेक जण त्याच ठिकाणी चिटकून बसतात तर बदली झाल्यानंतर चांगले ठिकाण मिळाले नसल्याची कुरकूर करत अनेक जण बदलीच्या ठिकाणी रुजू होत नाही. रुजू झाले तरी इथून लगेच आपली बदली करून घेतात. नऊ हजारांचे संख्याबळ असलेल्या नागपूर शहर पोलीस दलात यावर्षी ५२४ पोलीस कर्मचाऱ्यांचा बदल्यांचा सेवाकाळ पूर्ण झाला होता. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी १७ सप्टेंबरला त्यांच्या प्रमुखांना एक पत्र पाठवून १८ सप्टेंबरच्या सकाळी ११ वाजेपर्यंत बदलीसाठी पात्र असलेल्या पोलिसांचा सेवापट पोलीस मुख्यालयात सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यात कुचराई करणाºयावर कारवाईचीही तंबी दिली होती. त्यामुळे बदलीसाठी पात्र पोलीस कर्मचाºयांची यादी पोलीस मुख्यालयात तयार झाली. या सर्वांना त्यांच्या त्यांच्या पदानुसार वेळ देऊन पोलीस जिमखान्यात ठरलेल्या वेळी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. दुसरीकडे बदली प्रक्रियेत सहभागी असलेल्या या कर्मचाºयांना, लिपिकांना संबंधित सेवापटाची यादी घेऊन हजर राहण्यास सांगितले. पोलीस मुख्यालयाचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, प्रभारी सहपोलीस आयुक्त डॉ. नीलेश भरणे यांच्या उपस्थितीत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी सकाळी बदली दरबार सुरू केला. प्रत्येक कर्मचाºयाला तुम्हाला कुठे बदली पाहिजे, असे विचारले जाऊ लागले. कर्मचाºयाने पसंती दर्शविलेल्या ठिकाणी जागा असल्यास तात्काळ नियुक्ती दिली जात होती. रिक्त जागा नसेल तर त्याला दुसरा पर्याय विचारला जात होता. अशाप्रकारे ५२४ ही जणांची त्यांच्या मर्जीनुसार बदली करण्यात आली. अत्यंत पारदर्शीपणे आणि ताबडतोब झालेल्या या बदली प्रक्रियेमुळे बहुतांश पोलीस कर्मचारी समाधान व्यक्त करत होते.
रिपीटर्सना ना ।
ज्यांनी एका ठिकाणी पाच वर्षे सेवाकाळ पूर्ण केला अशांनी त्याच ठिकाणी राहण्याची इच्छा व्यक्त करू नये,असे सांगण्यात आले होते.
दुसरे म्हणजे, वेगळ्या ठिकाणी नियुक्ती असूनही दुसºया ठिकाणी संलग्न असलेल्यानाही तातडीने नियुक्तीच्या ठिकाणी कर्तव्य बजावण्याचे आदेश देण्यात आले.
गुन्हेशाखेसाठी कसोटी!
पोलीस दलातील अनेक कर्मचारी गुन्हे शाखेत संधी मिळावी म्हणून प्रयत्नशील असतात. या बदली प्रक्रियेत ज्यांनी गुन्हे शाखेत नियुक्ती मागितली त्यांना पोलीस आयुक्तांनी वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्ती दिली. तेथे तुमचे काम बघितल्यानंतर गुन्हे शाखेत संधी दिली जाईल, असे सांगण्यात आल्याचे समजते.