'हमसे क्या भूल हुई', अनेकांचा प्रश्न; पोलीस दलात धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 03:22 PM2020-09-19T15:22:00+5:302020-09-19T15:22:20+5:30
पीसी (पोलीस कॉन्स्टेबल) टू डीजीपी (पोलीस महासंचालक) अशा सर्वांच्याच मुखात असलेला हा विषय म्हणजे बदलीचा (स्थानांतरण) विषय होय. बदलीच्या या विषयामुळे संबंधितांकडून कोरोनाचीही चर्चा तात्पुरती बाजूला सारली जात आहे.
नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य पोलिस दलाला सध्या एकाच विषयाने ढवळून काढले आहे. धावपळ वाढवली आहे. पीसी (पोलीस कॉन्स्टेबल) टू डीजीपी (पोलीस महासंचालक) अशा सर्वांच्याच मुखात असलेला हा विषय म्हणजे बदलीचा (स्थानांतरण) विषय होय. बदलीच्या या विषयामुळे संबंधितांकडून कोरोनाचीही चर्चा तात्पुरती बाजूला सारली जात आहे.
दरवर्षी जून-जुलैपर्यंत राज्य पोलीस दलातील सार्वत्रिक बदल्या व्हायच्या. बदलीसाठी पात्र असलेल्या पोलिसांच्या पाल्यांच्या शाळा-महाविद्यालय प्रवेशाचा मुद्दा लक्षात घेऊन जून-जुलैचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. माजी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात जून-जुलैला फाटा देऊन बदलीचा विषय लांबणीवर टाकण्यात आला. त्यांच्यानंतर सरकार बदलले आणि पोलिसांच्या बदलीचा विषय आणखीनच क्लिष्ट ठरला. त्यात कोरोनानेही नाक खुपसले. बहुतांश पोलिस अधिकाऱ्यांच्या नावावर आणि ठिकाणावर एकमत होत नसल्याने वारंवार बदलीच्या मुद्याला बगल दिली जाऊ लागली. अखेर सप्टेंबर महिन्यात हा विषय मार्गी लागला. २ आणि ३ तसेच १७ सप्टेंबरला बदलीसाठी पात्र असणाऱ्यांपैकी बहुतांश अधिकाऱ्यांची बदली झाली. अनेकांना पदोन्नतीही मिळाली.
अनेक ‘गॅस’वर
गुरुवारी जाहीर झालेल्या यादीनुसार, पोलीस अधीक्षक, उपायुक्तांपासून तो अतिरिक्त महासंचालकांपर्यंतच्या अनेक अधिकाऱ्यांना वेटिंगवर (पोलिसांच्या भाषेत गॅसवर) ठेवण्यात आल्यामुळे ते ‘हमसे क्या भूल हुई’, असा प्रश्न करीत आहेत. दुसरे म्हणजे, डीवायएसपी, पोलीस निरीक्षक आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या ‘निवड-नियुक्ती’चा मुद्दाही शिल्लक आहे. त्यासाठी त्यांनी आता धावपळ सुरू केली आहे. नागपुरात नऊ हजारांपैकी सुमारे एक हजार अधिकारी-कर्मचारी बदलीस पात्र आहेत. त्यातील काहींनी आपापल्या परीने लॉबिंगही चालविले आहे. काहींनी पॅकिंगही सुरू केले आहे.
मुख्यालयातून २४ तासांचा अल्टिमेटम
शहर पोलीस मुख्यालयातून १७ सप्टेंबरला स्थानिक वरिष्ठांना पत्र पाठविण्यात आले. बदलीसाठी पात्र असलेल्या तुमच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांचा सेवापट पोलीस मुख्यालयात विशेष दूतामार्फत सादर करा, असे या पत्रात नमूद आहे. सेवापटाच्या यादीत संबंधित कर्मचाऱ्याला मिळालेले रिवॉर्ड, शिक्षा आणि अन्य बाबींचाही उल्लेख करण्याच्या स्पष्ट सूचना आहेत. १८ सप्टेंबरच्या सकाळी ११ वाजेपर्यंत सेवापटाची यादी पोलीस मुख्यालयात सादर न झाल्यास संबंधित लिपिकाला जबाबदार धरण्यात येईल, अशी तंबीही या पत्रातून देण्यात आली आहे.