नागपुरात पोलिसांची राष्ट्रीय एकता दौड : न्यायमूर्ती अन् पोलीस आयुक्तांसह तरुणाईही धावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 12:20 AM2019-11-01T00:20:29+5:302019-11-01T00:22:27+5:30
देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४४ व्या जयंतीचे औचित्य साधून भल्या सकाळी गुलाबी थंडीत झालेल्या या रॅलीत विविध क्षेत्रातील मान्यवरांसह अनेकांनी सहभाग नोंदविला. न्यायमूर्ती, पोलीस आयुक्तांसह तरुणाईही धावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४४ व्या जयंतीचे औचित्य साधून शहर आणि ग्रामीण पोलीस दलाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. भल्या सकाळी गुलाबी थंडीत झालेल्या या रॅलीत विविध क्षेत्रातील मान्यवरांसह अनेकांनी सहभाग नोंदविला. न्यायमूर्ती, पोलीस आयुक्तांसह तरुणाईही धावली.
पोलीस जिमखान्यापासून सुरू झालेल्या या दौडीच्या प्रारंभी मुख्य अतिथी म्हणून उच्च न्यायालयाचे न्या. झेड. ए. हक, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहआयुक्त रवींद्र कदम, विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. प्रसन्ना, अतिरिक्त आयुक्त बी. बी. गायकवाड उपस्थित होते. त्यांनी हवेत बलून सोडून दौडला सुरुवात केली. विशेष म्हणजे, ५ किलोमीटर दौडीत स्वत: न्या. हक, डॉ. उपाध्याय, प्रसन्ना, गायकर, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, उपायुक्त विनीता साहू, उपायुक्त गजानन राजमाने, उपायुक्त विक्रम साळी, उपायुक्त चिन्मय पंडित सहभागी झाले होते. गुलाबी थंडीत पोलीस बॅण्डच्या गजराने दौडीला प्रारंभ झाला. त्यात पोलीस तसेच विविध विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह मोठ्या संख्येत तरुण-तरुणी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. पोलीस जिमखाना, लेडीज क्लब, लॉ कॉलेज चौक, भोेले पेट्रोल पंप, जीपीओ चौक, जपानी गार्डन, रामगिरी ते पुन्हा जिमखाना असा दौडीचा मार्ग होता.