पोलिसांमागे धावत होते पोलीस ! कायदा तोडणाऱ्या ५५ पोलिसांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 11:49 PM2019-09-24T23:49:58+5:302019-09-24T23:52:26+5:30
कायदा तोडणारे पोलीस आणि त्यांच्या मागे धावून, त्यांना मध्येच अडवून त्यांच्यावर कारवाईच्या रूपाने कायद्याचा बडगा उगारणारे पोलीस असे विसंगत मात्र आश्वासक चित्र उपराजधानीतील विविध भागात नागरिकांनी बघितले. तब्बल ५५ पोलिसांवर चालान कारवाई करण्यात आली .
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कायदा तोडणारे पोलीस आणि त्यांच्या मागे धावून, त्यांना मध्येच अडवून त्यांच्यावर कारवाईच्या रूपाने कायद्याचा बडगा उगारणारे पोलीस असे विसंगत मात्र आश्वासक चित्र उपराजधानीतील विविध भागात नागरिकांनी बघितले. होय, सोमवारी दिवसभरात वाहतूक पोलिसांनी कायदा तोडणाऱ्या थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल ५५ पोलिसांवर चालान कारवाई केली. या कारवाईत केवळ पोलीस कर्मचारीच नव्हे तर काही अधिकारीही अडकले.
वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, कुणाचीही गैरसोय होऊ नये आणि अपघात घडू नये म्हणून वाहतुकीचे नियम, कायदे बनविण्यात आले आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध वाहतूक पोलीस चालान कारवाई करतात. पोलीस नागरिकांवर कारवाई करतात मात्र वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पोलिसांवर कधीच कारवाई करीत नाही, अशी सर्वसामान्य वाहनचालकांची ओरड असते. वाहतूक पोलिसांवर पक्षपाताचाही आरोप होतो. अनेकदा तक्रारीही होतात. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, वाहतूक शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांनी हा आरोप टाळण्यासाठी ‘कायदा सर्वांसाठी समान’ याची प्रचिती देणारी मोहीम सोमवारी शहरात राबविली. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारा सर्वसामान्य माणूस असो, पोलीस कर्मचारी असो की अधिकारी अशा सर्वांवरच कारवाईचा धडाका लावण्यात आला. त्यात चक्क ५५ पोलीस अडकले. या सर्वांवर चालान कारवाई करून दंड वसूल करण्यात आला. कारवाईत अडकलेल्यांमध्ये गुन्हे शाखा, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) आणि उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या वाहन चालकांचाही समावेश आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल सबनीस, सहायक फौजदार पृथ्वीराज चव्हाण, ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही विशेष मोहीम राबविली.
कारवाईचे स्वरूप
विना हेल्मेट : ४३
सीटबेल्ट न लावणारे : १२
विविध वाहनांचे एकूण दोषी चालक : ५५
आपली जबाबदारी जास्त : डॉ. उपाध्याय
कायदा मोडणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार आम्हा पोलिसांना आहे. त्यामुळे कायद्याचे सक्तीने पालन करण्याची जबाबदारी आमची सर्वसामान्य नागरिकांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे पोलिसांनी कायद्याचे कसोशीने पालन केलेच पाहिजे, असे मत पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.