नागपुरातील कुख्यात आंबेकरच्या मालमत्तेकडे पोलीस नजर वळविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:43 AM2018-02-13T00:43:01+5:302018-02-13T00:47:03+5:30
बाल्या गावंडे हत्याकांडातील फरार आरोपी आणि शहरातील कुख्यात गुंड संतोष आंबेकर याला अटक करण्यासंबंधी त्याच्या मालमत्तेकडे पोलीस नजर वळविणार आहेत. गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीची मालमत्ता संलग्न केल्यास तो पोलिसांपुढे शरणागती पत्करतो, हे ध्यानात घेत पोलीस त्यासंबंधाने पाऊल उचलणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बाल्या गावंडे हत्याकांडातील फरार आरोपी आणि शहरातील कुख्यात गुंड संतोष आंबेकर याला अटक करण्यासंबंधी त्याच्या मालमत्तेकडे पोलीस नजर वळविणार आहेत. गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीची मालमत्ता संलग्न केल्यास तो पोलिसांपुढे शरणागती पत्करतो, हे ध्यानात घेत पोलीस त्यासंबंधाने पाऊल उचलणार आहेत.
बाल्या गावंडेची आपल्या हस्तकांमार्फत हत्या करून घेतल्याचा संतोष आंबेकरवर आरोप आहे. पोलिसांनी त्याला त्या गुन्ह्यात आरोपी करताच तो नागपुरातून फरार झाला. त्याला वर्षभरापासून पोलीस शोधत आहेत. दरम्यान, बाल्या गावंडे हत्याकांडाची न्यायालयात सुनावणी झाली. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची कोर्टातून मुक्तता झाली. मात्र, संतोष आंबेकर पोलिसांच्या हाती लागला नाही. यासंबंधाने सोमवारी पत्रकार परिषदेत प्रश्न उपस्थित झाला असता, गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांनी त्यावर उत्तर दिले. फरार आरोपीची मालमत्ता संलग्न करून त्याला घेरण्याच्या प्रचलित पद्धतीचा संतोष आंबेकरवरही वापर केला जाणार आहे.
सुजल वासनिक सापडेना
कामठीतून अपहरण करण्यात आलेल्या सुजल वासनिकचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश आले नाही, यासंबंधाने प्रश्न उपस्थित झाला असता शोध सुरू आहे, असे उत्तर उपायुक्त कदम यांनी दिले. सुजलचे अपहरण होऊन चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. असेच चार दिवसांपूर्वी एका पोलीस पुत्राचे अपहरण झाले. तो परत आल्याची माहिती उपायुक्त कदम यांनी दिली. त्यासंबंधाने विस्तृत माहिती घेण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक त्या मुलाच्या घरी गेल्याचेही त्यांनी सांगितले.