नागपुरात पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 09:41 PM2020-07-28T21:41:34+5:302020-07-28T21:42:39+5:30
झेंडा लावण्यावरून दोन गटात वाद निर्माण झाल्यानंतर एका गटातील महिला पुरुषांनी दुसऱ्या गटातील मंडळींना मारहाण केली. समजावण्यासाठी पुढे आलेल्या पोलिसांनाही या गटाने मारहाण केली यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सकाळी ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : झेंडा लावण्यावरून दोन गटात वाद निर्माण झाल्यानंतर एका गटातील महिला पुरुषांनी दुसऱ्या गटातील मंडळींना मारहाण केली. समजावण्यासाठी पुढे आलेल्या पोलिसांनाही या गटाने मारहाण केली यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सकाळी ही घटना घडली.
यशोधरानगरात नाल्याच्या काठावरची जागा स्वच्छ करून सोमवारी सकाळी तेथे काही जणांनी झेंडा लावण्यासाठी भूमिपूजन केले. तेथे काही लोकांनी त्याला विरोध केला. त्यातून वाद वाढला. ही माहिती मिळाल्यानंतर एएसआय राजेश बाबूलाल मौर्य आपल्या सहकाऱ्यांसोबत तेथे पोहचले. त्यांनी इंदिरा माता नगर, कराटे मैदान जवळ जमलेल्या जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपी प्रशांत गजभिये, रोशन ठवरे, आकाश पिल्लेवान, प्रवीण पिल्लेवान, आकाश मोटघरे, आणि साथीदारांनी मौर्य यांना अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. त्यांच्या बाजूला असलेल्या सोनाली पौनीकर हिला विटांनी मारले. अन्य काही आरोपींनी निलेश हेडावू यांना धारदार शस्त्राने मारून दहशत निर्माण केली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. ही घटना कळल्यानंतर यशोधरा नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींना आवरले. मौर्य यांच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याच्या आरोपाखाली उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला तर रात्री नीलेश हेडावू यांच्या तक्रारीवरून पुन्हा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला.