युवतीची छेडखानी करणारा पोलीस शिपाई बरखास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 10:45 PM2020-07-17T22:45:24+5:302020-07-17T22:46:35+5:30
ग्रामीण पोलीस सायबर सेलमध्ये कार्यरत पोलीस शिपायास एका युवतीची छेडखानी करण्याच्या प्रकरणात बरखास्त करण्यात आले आहे. यासंबंधात शुक्रवारी ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आदेश जारी केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ग्रामीण पोलीस सायबर सेलमध्ये कार्यरत पोलीस शिपायास एका युवतीची छेडखानी करण्याच्या प्रकरणात बरखास्त करण्यात आले आहे. यासंबंधात शुक्रवारी ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आदेश जारी केले आहेत. तुलाराम चटप असे आरोपी पोलीस शिपायाचे नाव आहे. फिर्यादी २५ वर्षीय युवतीला काही दिवसांपासून फेसबुकवर अश्लील मॅसेज येत होते. यामुळे युवती ९ जुलै रोजी अरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेली. तेव्हा तिला ग्रामीण पोलिसांच्या सायबर सेलकडे पाठवण्यात आले. पीडित युवती १४ जुलै रोजी ग्रामीण पोलिसच्या सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्यास गेली. तिथे तैनात पोलीस शिपाई तुलारामने युवतीला तक्रारीबाबत चर्चा करण्यासाठी १६ जुलै रोजी कपिलनगर ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्रामीण पोलीस मुख्यालयातील आपल्या क्वॉर्टरवर बोलावले. सायंकाळी ६ वाजता पीडित युवती क्वॉर्टरवर पोहोचली तेव्हा आरोपी शिपायाने तिची छेडखानी करीत तिला अपमानित केले. फिर्यादीच्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी आरोपी तुलारामविरुद्ध कलम ३४१, ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस अधीक्षक आलो यांनी या प्रकरणाला अतिशय गांभीर्याने घेतले शिपाई तुलाराम याला कलम ३११ (२) अंतर्गत पोलीस विभागातून बरखास्त करण्याचे आदेश दिले. यासोबतच एलसीबीला तुलाराम याला अटक करून कपिलनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे निर्देशही दिले. पोलीस विभागाची प्रतिमा मलीन करणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सहन केले जाणार नाही, असे पोलीस अधीक्षक ओला यांनी स्पष्ट केले आहे.