प्रजासत्ताकदिनी विद्यार्थिनींवर नोटा उधळणारा हवालदार निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 10:36 AM2019-01-29T10:36:53+5:302019-01-29T10:39:25+5:30
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य सादर करणाऱ्या शाळकरी मुलींवर नोटा उधळणारा नांद पोलीस चौकीचा बीट अंमलदार प्रमोद वाळके याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य सादर करणाऱ्या शाळकरी मुलींवर नोटा उधळणारा नांद पोलीस चौकीचा बीट अंमलदार प्रमोद वाळके याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यासोबतच वाळके याच्यासोबत दारू पिणाऱ्या उमरेड पोलीस ठाण्याचा पोलीस हवालदार अजय चौधरी व सुनील बनसोड यांची नागपूर ग्रामीण पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.
‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात ‘पोलिसाने उधळल्या विद्यार्थिनींवर नोटा’ या मथळ्यातील वृत्त प्रकाशित करीत नांद येथे जि.प. शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात गोंधळ घालणारा पोलीस हवालदार प्रमोद वाळके याच्या कृत्याकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी उपरोक्त कारवाई केली आहे. यासोबतच या तिन्ही कर्मचाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले. नांद जिल्हा परिषद हायस्कूल व माध्यमिक विद्यालयात शनिवारी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान सहाव्या वर्गातील मुलींच्या नृत्याचे सादरीकरण सुरू असताना प्रमोद वाळके हा मंचावर पोहचला व त्याने मुलींच्या अगदी मधोमध जाऊन नृत्याच्या सादरीकरणादरम्यान नोटांची उधळण केली होती. या गैरवर्तनप्रकरणी वाळके याच्यावर कारवाई करण्याची मागणी नांद येथील सरपंच तुळशीदास चुटे व ग्रामस्थांनी केली होती. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.