अंधश्रद्धेच्या विखारी दंशावर पोलिसी उतारा

By admin | Published: July 9, 2016 02:52 AM2016-07-09T02:52:55+5:302016-07-09T02:52:55+5:30

विषारी नागाने दंश केल्यामुळे क्षणाक्षणाला मृत्यू तिच्याभोवती विळखा घट्ट करीत होता. तशात अंधश्रद्धेच्या खोल गर्तेत बुडालेले काही गावकरीही तिला मृत्यूच्या जबड्यात ढकलण्याचे प्रयत्न करीत होते.

Policeman transit on superstition punishments | अंधश्रद्धेच्या विखारी दंशावर पोलिसी उतारा

अंधश्रद्धेच्या विखारी दंशावर पोलिसी उतारा

Next

सर्पदंशानंतर मंत्रोपचाराचा खेळ : सर्पमित्राच्या प्रसंगावधानाने वाचला महिलेचा जीव
नरेश डोंगरे । नागपूर
विषारी नागाने दंश केल्यामुळे क्षणाक्षणाला मृत्यू तिच्याभोवती विळखा घट्ट करीत होता. तशात अंधश्रद्धेच्या खोल गर्तेत बुडालेले काही गावकरीही तिला मृत्यूच्या जबड्यात ढकलण्याचे प्रयत्न करीत होते. जगण्यामरणाच्या लढाईचा शेवट काय होईल, याची कल्पना आल्याने एका सर्पमित्राने प्रसंगावधान राखत पोलिसांना एक फोन केला अन् या एका फोनमुळे जगण्याच्या संघर्षाला बळ मिळाले. मृत्यूचा विळखा सैल होऊ लागला. अंधश्रद्धेच्या विखारी दंशावर पोलिसांचा दंडाही कामी आला. त्याचमुळे दोन चिमुकल्यांच्या आईचा जीव धोक्याबाहेर आला.

विज्ञानाने विलक्षण प्रगती केली असली तरी अनेक गावखेड्यातील जनता अजूनही अंधश्रद्धेच्या गर्तेत खोलवर बुडाली आहे. आपली अंधश्रद्धा जपण्यासाठी ही मंडळी प्रसंगी कुणाच्या जीवाशीही खेळ करतात, त्याचे उदाहरण ठरलेली ही घटना कळमेश्वर तालुक्यात गुरुवारी सकाळी घडली.
काटोल मार्गावर वलनी हे छोटेसे खेडेगाव आहे. शेतकरी कुटुंबातील कविता दिवाकर फलके (वय २७) ही महिला नेहमीप्रमाणे गुरुवारी भल्या सकाळी उठली. ओम आणि तनवी ही तिची दोन चिमुकली. त्यांची घाईगडबडीतच तयारी करून तिने दार ओढले आणि त्यांना शाळेत पोहचवण्यासाठी निघाली. ७.३० च्या सुमारास घरी परत आली. काळ तिच्या दारात आडवा आला होता अन् ती अनभिज्ञ होती. त्यामुळे तिने दार उघडताच त्याने डाव साधला. दंशामुळे कविता किंचाळली. नंतर पायाजवळ भला मोठा साप पाहून तिची पाचावर धारण बसली.

निंबाच्या पाल्यावर बसवून उपचार
नागपूर : आरडाओरडा ऐकून शेजारी धावले. कविताला सर्पदंश झाल्याची वार्ता अल्पावधीतच गावभर पसरली अन् गावकरी धावून आले. साप दारामागे दडला होता. त्यांनी कविताला उचलले. उपचाराची घाईगडबड सुरू झाली मात्र औषधोपचाराची नव्हे...!
कविताला गावाच्या मंदिरात नेण्यात आले. तेथे निंबाच्या पाल्यावर बसवून गावठी अंधश्रद्धेचे उपचार सुरू झाले. बाऱ्या (मंत्रोपचार) म्हटले जाऊ लागले. तिकडे कविताच्या जीवाशी खेळ सुरू झाला. इकडे कविताभोवती मृत्यूचा विळखा घालणारा विषारी आकड्याचा नाग (स्पेक्टॅकल कोब्रा) सविताच्या दाराच्या फटीत अडकला होता. गावातील सर्पमित्र समीर तुमडेला ते कळले. नाग बघतानाच तो विषारी असल्याचे त्याने ओळखले. कविताला तातडीच्या औषधोपचाराची गरज असताना तिच्यावर धोकादायक गावठी उपचार सुरू असल्याचे पाहून त्याने गावकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधश्रद्ध मंडळींनी त्याचाच पाणउतारा केला.
प्रसंगावधान राखत समीरने नागपुरातील स्वप्निल बोधाणे या सर्पमित्राला माहिती दिली. ‘गावकरी मानायला तयार नाहीत. ते कवितावर गावठी उपचार करून तिच्या जीवाला धोका निर्माण करीत आहेत’,असेही सांगितले. धडपड्या स्वप्निलने त्याचे सहकारी श्रीकांत उके यांना कळविले. उकेने लगेच कळमेश्वर पोलीस ठाण्यात घटनाक्रम ऐकवला. त्याची ठाणेदार प्रताप राजपूत, हवालदार नरेश नारनवरे, रवी चटप यांनी तातडीने दखल घेतली. पोलीस पथक वलनीत पोहचले. कवितावर नको ते उपचार सुरू होते. अंधश्रद्ध मंडळींमुळे कविताची स्थिती गंभीर झाली होती. मंत्रोपचार करणारे भलताच उत्साह दाखवत होते तर त्यांना प्रोत्साहन देणारी मंडळी पोलिसांनाही विरोध करीत होती. कविताचा जगण्यामरणाचा संघर्ष लक्षात घेत पोलिसांनी आपला दंडुका दाखवला. मंत्रोपचार करणारांना दम दिला अन् त्यांच्या ताब्यातून कविताची सोडवणूक करीत तिला वाहनात घालून थेट नागपुरातील इस्पितळात भरती केले.

सापाचाही पोलिसांच्या वाहनातून प्रवास
दरम्यान, सर्पमित्रांची चमू वलनी गावात पोहचली होती. त्यांनी कविताला दंश केलेल्या नागाला पकडले. त्याला बंदिस्त करून पोलिसांसोबत सर्पमित्रसुद्धा रुग्णालयात आले. त्यांनी मेयोतील डॉक्टरांना तो नाग दाखवला. त्याच्या विषाची तीव्रता सांगितली. डॉक्टरांनी तातडीने प्रभावी उपचार सुरू केले. कवितानेही प्रतिसाद दिला. ३६ तासानंतर तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. सर्पमित्राचे प्रसंगावधान आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे अंधश्रद्धेला चाप बसला अन् एका महिलेचेही प्राण धोक्याबाहेर आले.

Web Title: Policeman transit on superstition punishments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.