पोलिसालाच चाकू दाखवून लुटले, पत्नीचे मंगळसूत्र व रोख रक्कम हिसकावून नेली
By admin | Published: July 10, 2017 11:07 PM2017-07-10T23:07:39+5:302017-07-10T23:07:39+5:30
पत्नीसोबत दुचाकीवर बसून घरी जात असलेल्या पोलीस शिपायाला रस्त्यात अडवून दोन लुटारूंनी त्याच्या गळ्याला चाकू लावला आणि त्याचा मोबाईल
Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 10 - पत्नीसोबत दुचाकीवर बसून घरी जात असलेल्या पोलीस शिपायाला रस्त्यात अडवून दोन लुटारूंनी त्याच्या गळ्याला चाकू लावला आणि त्याचा मोबाईल, रोख चार हजार रुपये तसेच त्याच्या पत्नीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. रविवारी दुपारी नागपूर जबलपूर मार्गावर ही घटना घडली. चक्क पोलिसालाच चाकूचा धाक दाखवून लुटल्यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणेत खळबळ निर्माण झाली आहे.
मनोज प्रकाश गजभिये (वय ३४) असे फिर्यादी पोलिसाचे नाव आहे. ते पोलीस मुख्यालयात कार्यरत असून, गोंडेगाव-कन्हान येथे राहतात. रविवारी दुपारी ते पत्नीसह टाकळघाटला विक्तूबाबांच्या दर्शनासाठी गेले होते. दुपारी ३ च्या सुमारास ते दुचाकीवरून (एमएच ४०/ एएच ४९८६) गावाकडे परत जात होते. नागपूर - जबलपूर महामार्गावर मागून पाठलाग करीत आलेल्या लुटारूंनी तरोडी-कापसी पुलाजवळ गजभियेंच्या दुचाकीसमोर आपली दुचाकी आडवी करून त्यांना रोखले. त्यानंतर लुटारूंनी गजभियेंच्या गळ्याला चाकू लावला. त्यांना आणि त्यांच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी देऊन गजभियेच्या पाकिटमधील चार हजार रुपये, मोबाईल आणि त्यांच्या पत्नीचे मंगळसूत्र असा एकूण ५५ हजारांचा मुद्देमाल हिसकावून लुटारू पळून गेले. या प्रकारामुळे गजभिये दाम्पत्य दहशतीत आले. भांबावून गेल्यामुळे काही वेळ त्यांना काही सुचलेच नाही. काही वेळेनंतर रस्त्याने जाणाºयांना थांबवून त्यांनी लुटमारीची घटना सांगितली आणि लुटारू ज्या दिशेने पळाले त्या दिशेने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अर्धा तास वाया घातल्यानंतर ते कळमना ठाण्यात पोहचले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सहायक पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी गुन्हा दाखल करून लुटारूंची शोधाशोध सुरू केली.
भलत्याचीच निघाली दुचाकी-
लुटारूंनी या गुन्ह्यात जी दुचाकी वापरली होती. तिच्या नंबरप्लेटवरून कळमना पोलिसांनी दुचाकीधारकाचे घर गाठले. त्याला ठाण्यात आणून त्याची चौकशी केली असता संबंधित दुचाकीधारकाचा या गुन्ह्याशी कसलाही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. आरोपींनी बनावट नंबर प्लेट वापरून हा गुन्हा केल्याचेही त्यातून उघड झाले. त्यामुळे आरोपी सराईत गुन्हेगार असावे, असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे.