पोलीसपुत्राचा जामीन फेटाळला

By admin | Published: March 29, 2016 03:54 AM2016-03-29T03:54:51+5:302016-03-29T03:54:51+5:30

नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करणाऱ्या एका पोलीस हेड कॉन्स्टेबलच्या मुलाचा

The police's bail plea is rejected | पोलीसपुत्राचा जामीन फेटाळला

पोलीसपुत्राचा जामीन फेटाळला

Next

नागपूर : नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करणाऱ्या एका पोलीस हेड कॉन्स्टेबलच्या मुलाचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला.
चेतन दिलीप फालके (२८) रा. सुमेधनगर सुगतनगर जरीपटका, असे आरोपीचे नाव आहे. त्याचे वडील दिलीप रामभाऊ फालके (५३) हा कन्हान पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल आहे. तोही या प्रकरणात आरोपी असून सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहे. चेतन फालके हा मूळचा उमरेड कावरापेठ भागातील रहिवासी आहे.
१६ मे २०१५ ते १६ फेब्रुवारी २०१६ या दरम्यान फसवणूक करण्यात आली. १६ फेब्रुवारी रोजी इंदिरानगर येथील मंगेश मणिराम नागदेवे यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भादंविच्या ४२०, २९४, ५०६, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रकरण असे की, मंगेश नागदेवे यांचा भाऊ निशांत याला लार्सन अँड टुब्रो कंपनीत नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून मुख्य सूत्रधार चेतन फालके याने आपली आई प्रतिभा फालके हिच्या बँक खात्यात १ लाख ५० हजार आणि भाऊ प्रतीक फालके याच्या खात्यात दीड लाख रुपये जमा करण्यास सांगितले होते. त्यानुसार नागदेवे याने तीन लाखांची ही रक्कम दोघांच्याही खात्यात जमा केली होती. आरोपीने कंपनीचे खोटे नियुक्तीपत्र दिले होते. आपली फसवणूक झाल्याचे नागदेवे यांच्या लक्षात येताच त्यांनी आरोपीला आपले पैसे परत मागितले होते. आरोपीने ७३ हजार रुपये परत करून २ लाख २७ हजार रुपये परत केले नव्हते. आरोपी चेतनचे वडील हेड कॉन्स्टेबल दिलीप फालके याने नागदेवे यांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती.
या प्रकरणात सत्यजीत सपकाळ, चेतनची आई प्रतिभा आणि भाऊ प्रतीक यांनाही आरोपी करण्यात आलेले आहे. चेतन आणि त्याचे वडील दिलीप फालके हे अटकेत असून ते कारागृहात आहेत. उर्वरित आरोपी फरार आहेत. या टोळीने लालगंज खापेकर गल्ली येथील सुनील शंकरराव वाकडीकर याला एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया येथे नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले होते. आरोपी चेतनच्या सांगण्यावरून वाकडीकर यांनी दोन लाख रुपये रोख चेतनला दिले होते आणि ५० हजाराचा चेक पुष्पा प्रकाश गेडाम हिच्या बँक खात्यात जमा केला होता.
वाकडीकर यांची २ लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. पिंपरी कन्हान येथील सुमेध सुखदेव खोब्रागडे यांच्या लहान भावाला नोकरी लावून देण्यासाठी आरोपीने ३० हजार रुपये रोख आणि २ लाख ७० हजार रुपयाचे चेक, असे एकूण ३ लाख रुपये घेऊन फसवणूक केली. कपिलनगर मैत्री कॉलनी येथील प्रशांत गोरखनाथ भेले यांची झायलो गाडी कंपनीत लावून देण्यासाठी चेतनने २५ हजार रुपये सिक्युरिटीच्या स्वरूपात घेऊन फसवणूक केली. बिहारच्या औरंगाबाद येथील सुमित रामजी विश्वकर्मा याला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून हेड कॉन्स्टेबल दिलीप फालके याने १ लाख रुपये घेऊन फसवणूक केली. झारखंड हजारीबाग येथील त्रिवेणी साव गुडन साव यांनाही नोकरीचे आमिष दाखवून ६० हजार रुपये घेऊन फसवणूक केली. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील मदन सेनाड यांनी काम पाहिले. पोलीस उपनिरीक्षक ए.वाय. बकाल हे तपास अधिकारी आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The police's bail plea is rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.