प्रीतीवरची पोलिसांची ‘प्रीत’ कायम : अनेक तक्रारी थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 12:41 AM2020-06-19T00:41:51+5:302020-06-19T00:43:25+5:30

अनेकांचे आर्थिक आणि शारीरिक शोषण करून त्यांना प्रचंड मानसिक त्रास देणारी कुख्यात महाठग प्रीती दास हिच्यावर पोलिसांची प्रीत अजूनही कायम असल्याचे अनेक उदाहरणांतून उघड होत आहे.

Police's 'love' for Preeti remains: many complaints in cold storage | प्रीतीवरची पोलिसांची ‘प्रीत’ कायम : अनेक तक्रारी थंडबस्त्यात

प्रीतीवरची पोलिसांची ‘प्रीत’ कायम : अनेक तक्रारी थंडबस्त्यात

Next
ठळक मुद्देगुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेकांचे आर्थिक आणि शारीरिक शोषण करून त्यांना प्रचंड मानसिक त्रास देणारी कुख्यात महाठग प्रीती दास हिच्यावर पोलिसांची प्रीत अजूनही कायम असल्याचे अनेक उदाहरणांतून उघड होत आहे. तिच्याविरुद्ध आलेल्या अनेक तक्रारी थंडबस्त्यात टाकून तर काही तक्रारी टोलविण्यासाठी पोलिसांनी कसरत चालविलेली आहे. त्यामुळे कुख्यात प्रीतीवर पोलिसांची ‘प्रीत’ अजूनही कायम असल्याचे बोलले जात आहे. प्रीतीच्या ‘ब्लॅकमेलिंग’ची साक्षीदार असलेल्या शीतल नामक तरुणीने चार दिवसांपूर्वी पाचपावली पोलिसांकडे तक्रार नोंदविली. तिच्या नावाने प्रीतीने एका व्यक्तीकडून वीस हजार रुपयांची खंडणी उकळली. पोलीस तपासात रोकड देणाऱ्या व्यक्तीने ते मान्यही केले. तरीसुद्धा वेगवेगळे कारण पुढे करून पोलिस हा गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत.
प्रीतीने आपल्याला ४० ते ५० लाखांची टोपी घातल्याची तक्रार इर्शाद नामक पीडित व्यक्तीने बुधवारी पाचपावली ठाण्यात नोंदविली होती. पोलिसांनी त्याला कागदपत्रे घेऊन आज चौकशीसाठी बोलविले होते. मात्र तो आला नाही, असे पाचपावली पोलिसांचे म्हणणे आहे. अशा गुन्ह्यात पोलिसांनी तत्परता दाखवण्याची गरज असताना तो आलाच नाही, त्याच्याकडे कागदपत्रे नाहीत, हा गुन्हा आमच्या कार्यक्षेत्रात येत नाही, अशा सबबी सांगून पोलीस आपली जबाबदारी झटकू पाहत आहेत. त्यामुळे प्रीती सोबतच तिच्या पापाचे वाटेकरी असलेल्या काही पोलिसांबाबतही जनमानसातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

प्रीतीच्या सहकाऱ्यांची झाडाझडती सुरू
कुख्यात प्रीतीसोबत वारंवार संपर्कात राहणाऱ्या अनेकांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या रवी घाडगे नामक तरुणाचे पाचपावली पोलिसांनी बुधवारी रात्री बयाण नोंदवून घेतले. तर आज सलीम आणि प्रकाशला पोलिसांनी बयाणासाठी बोलविले. प्रीतीच्या कॉल डिटेल्समध्ये तिच्या संपर्कात ही मंडळी जवळपास रोजच असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे कोणत्या कारणामुळे ते प्रीतीच्या संपर्कात होते, याची आम्ही चौकशी करीत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी दिली.

Web Title: Police's 'love' for Preeti remains: many complaints in cold storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.