ड्रग्ज विक्रेत्यांविरोधात पोलिसांचे ‘ऑपरेशन थंडर’, सहा तासांतच १५३ आरोपींवर हंटर
By योगेश पांडे | Published: October 18, 2024 06:04 PM2024-10-18T18:04:42+5:302024-10-18T18:05:35+5:30
पाचशेहून अधिक ड्रग पेडलर्स, तस्कर फरारच : सर्व आरोपींचा डेटा बेस तयार करणार
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी नागपूर पोलिसांनी गुन्हेगारांविरोधातच मोहीम उघडली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर पोलिसांनी ‘ऑपरेशन थंडर’ राबवत काही तासांतच ड्रग्ज तस्करी व विक्रीशी संबंधित १५३ आरोपी ताब्यात घेतले. तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. या सर्व आरोपींच्या बायोमॅट्रीक, फेस रिकग्निशनसोबत डेटा बेस तयार करण्यात येत आहे. त्यामुळे यानंतर त्यांनी काही गुन्हा केला तर त्यांच्यापर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे.
पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेदरम्यान ही माहिती दिली. मागील काही काळापासून नागपुरात अंमली पदार्थांच्या विक्रीचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: तरुण पिढीला टार्गेट करून पब्ज, कॅफेजमध्ये यांची विक्री करण्यात येते व अनेक ठिकाणी पोलिसांनी धाडी टाकत आरोपींनादेखील अटक केली. ड्रग्जतस्करीशी जुळलेल्या सुमारे ८०० गुन्हेगारांची यादी पोलिसांकडे होती. ड्रग्ज फ्री नागपूर करण्यासाठी पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून पहाटे सहा वाजेपर्यंत ऑपरेशन थंडर राबविले. याअंतर्गत सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱी, गुन्हेशाखेचे सर्व युनिट्स यांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. २०२० ते २०२४ दरम्यान अंमली पदार्थाशी संबंधित कुठल्या ना कुठल्या गुन्ह्यात अडकलेल्या गुन्हेगारांची या पथकांनी त्यांच्या पत्त्यावर जाऊन झाडाझडती घेतली. पोलिसांना १५३ गुन्हेगार आढळले. १६४ गुन्हेगार बाहेरगावी होते, एकाचा मृत्यू झाला आहे तर १५ जण तुरुंगात आहेत. मात्र उर्वरित पाचशे गुन्हेगार त्यांच्या पत्त्यांवर नव्हते. १५३ गुन्हेगारांना गुन्हेशाखेच्या कार्यालयात नेण्यात आले व त्यांची सखोल माहिती घेण्यात आली. यात पाच ते सहा महिलांचादेखील समावेश होता. पोलिसांनी त्यांचे डोझीअर तयार केले असून त्यांच्या मोबाईलचीदेखील तपासणी करण्यात आली.
गुन्हे करतील तर पकडले जातील
या सर्व आरोपींची ‘सिम्बा प्रणाली ॲप’मध्ये सखोल माहिती भरण्यात आली. तसेच प्रत्येकाचे वेगवेगळ्या ॲंगलने फोटो काढण्यात आले. तसेच आवाजाचे सॅम्पलदेखील घेण्यात आले. शहरात अनेक ठिकाणी ‘फेस रिकग्निशन कॅमेरे’ लागले आहेत. जर या गुन्हेगारांनी कुठलाही गुन्हा केला तर या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ते सहज पकडले जातील. तसेच त्यांच्या गुन्हेगारी इतिहासाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.
गंभीर गुन्ह्यांच्या आरोपींविरोधातदेखील मोहीम राबविणार
गुन्हेगारांची डेटा बॅंक असणे काळाची गरज झाली आहे. त्यामुळे घरफोडी, हत्या, हल्ला, चोरी इत्यादी गंभीर गुन्ह्यांत सहभागी असलेल्या गुन्हेगारांविरोधातदेखील अशा प्रकारे लवकरच मोहीम राबविण्यात येणार आहे.