धनादेश वटलाच नाही फसवणूक प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद
By admin | Published: May 6, 2016 03:12 AM2016-05-06T03:12:16+5:302016-05-06T03:12:16+5:30
२०१० मध्ये राजू प्यारेलाल जयस्वाल, विजय शंकर तालेवार, गोपाल भिवाजी अंगलेकर, तुशांत किसन नंदागवळी आणि शंकर ठाकरे यांनी संगनमत करून
नागपूर : २०१० मध्ये राजू प्यारेलाल जयस्वाल, विजय शंकर तालेवार, गोपाल भिवाजी अंगलेकर, तुशांत किसन नंदागवळी आणि शंकर ठाकरे यांनी संगनमत करून रामदास भोयर यांच्या एक एकर जमिनीचा १५ लाख रुपयांत सौदा केला. पाच लाख रोख आणि विजय तालेवार यांनी भोयर यांना धनादेशाद्वारे दहा लाख रुपये दिले, असे व्यवहारात दाखवण्यात आले. दहा लाखांचा हा धनादेश वटलाच नाही.
विशेष म्हणजे, जमीन खरेदीच्या या व्यवहाराची वृत्तपत्रात जाहीर सूचना देण्यात आली. ती वाचण्यात आल्यामुळे भोयर यांची पत्नी विजया यांनी या व्यवहारावर आक्षेप घेतला. त्या आणि त्यांची मुले जमिनीचे कायदेशीर वारस असतानादेखिल त्यांच्या आक्षेपाला बेदखल करीत आरोपींनी ३१ जुलै २०१० ला सदरमधील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात विक्रीपत्र तयार करून घेतले. परिणामी फेब्रुवारी २०११ मध्ये सदर पोलीस ठाण्यात त्यांनी फसवणुकीची तक्रार दाखल केली. मात्र, तत्कालीन पोलीस निरीक्षकाने थातूरमातूर तपास करून 'अ समरी' अहवाल तयार केला. पोलिसांकडून झिडकारण्यात आल्यामुळे एकाकी अन् हतबल झालेल्या विजया भोयर यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. त्यानंतर या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेने सुरू केला. मनोरुग्ण व्यक्तीशी केलेला व्यवहार ग्राह्य धरता येत नाही. फसवणूक करण्याच्या उद्देशानेच आरोपींनी कटकारस्थान रचून हा व्यवहार केल्याचे स्पष्ट दिसत असल्यामुळे मंगळवारी रात्री पोलिसांनी निडोज बारचा मालक राजू जयस्वाल, गोपाल अंगलेकर, तुषांत नंदागवळी आणि शंकर ठाकरे या चार आरोपींना अटक केली.
तर कारवाईची कुणकुण लागताच तालेवार फरार झाला. बुधवारी दुपारी अटकेतील आरोपींना गुन्हेशाखेच्या अधिकाऱ्यांनी कोर्टात हजर करून ११ मे पर्यंत पोलीस कोठडी मागितली.
मात्र, प्रकरणाच्या तपासातील कागदोपत्री त्रुटी अन् पोलिसांचा जुजबी स्वरूपाचा युक्तिवाद लक्षात घेऊन कोर्टाने पीसीआरची मागणी फेटाळून आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले. आरोपींच्या वकिलांनी लगेच जामिनाकरिता अर्ज सादर केला. त्यामुळे चौघांचाही जामीन मंजूर करण्यात आला.
दोषारोपपत्र लवकरच : उपायुक्त मासिरकर
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, गुन्ह्याचे स्वरूप आणि आरोपीच्या अटकेचे काही नियम आहेत. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे. तपासात फसवणूक झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे आम्ही आरोपींना अटक केली. एक आरोपी अद्यापही फरार असून, त्यालाही लवकरच अटक करू. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, कोर्टात लवकरच दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकर यांनी दिली.