पोलिसाच्या मुलाने पैसे बुडविले, तणावातून तरुणाची आत्महत्या
By योगेश पांडे | Published: August 26, 2024 10:57 PM2024-08-26T22:57:53+5:302024-08-26T22:58:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मित्राने घेतलेले ११.७० लाख रुपये परत करण्यास टाळाटाळ केल्याने तणावातून एका तरुणाने आत्महत्या केली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मित्राने घेतलेले ११.७० लाख रुपये परत करण्यास टाळाटाळ केल्याने तणावातून एका तरुणाने आत्महत्या केली. हुडकेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत दिघोरी येथे ही घटना घडली. आरोपीचे वडील पोलीस कर्मचारी आहेत.
तुषार सुधीर येवले (२४) असे मृतकाचे नाव आहे. तुषारचे वडील विद्युत विभागात कर्मचारी आहेत. तुषारच्या वडिलांचा कामठी येथे प्लॉट होता. वडिलांनी काही काळापूर्वी प्लॉट विकला होता. यातून त्यांना पैसे मिळाले. तुषारचा गौरव चव्हाण नावाचा बालपणीचा मित्र आहे. त्याने तुषारकडे कॅफे उघडण्याचा मानस व्यक्त केला आणि त्यात गुंतवणूक करण्यास सांगितले. तुषारने त्याला पैसे देण्याची तयारी दाखविली. गौरवने सुरक्षा ठेव म्हणून तुषारला कोरा चेकही दिला. तुषारने वडिलांच्या खात्यातून ११.७० लाख रुपये गौरवच्या खात्यात ट्रान्सफर केले. काही काळाने गौरव कॅफे बंद करून मुंबईला गेला. तुषारने त्याला पैसे परत मागितले असता, त्याने कॅफे विकून पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्यानंतर तो टाळाटाळ करू लागला व तुषारला प्रतिसाद देणेही बंद केले
. गौरवच्या या वृत्तीला कंटाळून तुषारने २१ ऑगस्ट रोजी विष प्राशन केले. त्यांच्यावर सदर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. २४ ऑगस्ट रोजी त्याचे निधन झाले. सदर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. घटनेचे ठिकाण दिघोरी चौक असल्याने सोमवारी सायंकाळी तपास हुडकेश्वर पोलिसांकडे सोपविण्यात आला. विष प्राशन करण्यापूर्वी तुषारने सुसाइड नोट लिहून ठेवली होती. यामध्ये त्याने गौरवमुळे आत्महत्या करत असल्याचे स्पष्ट केले. त्या आधारे हुडकेश्वर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात रात्री उशीरा गौरवविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे. मागील तीन दिवसांपासून त्याने मोबाईल बंद करून ठेवला असून तो फरार आहे.