प्रभाग रचनेनंतर राजकीय वातावरण टाईट; पश्चिम, उत्तर काँग्रेसला पोषक, दक्षिण ‘टफ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2022 10:37 AM2022-02-03T10:37:27+5:302022-02-03T10:44:01+5:30
चार सदस्यीय प्रभाग रद्द करीत तीन सदस्यीय प्रभाग पद्धती लागू केल्यानंतर काँग्रेसमधून नाराजीचा सूर उमटला होता. मात्र, आता प्रत्यक्ष प्रभाग रचना झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
कमलेश वानखेडे
नागपूर : चार सदस्यीय प्रभाग रद्द करीत तीन सदस्यीय प्रभाग पद्धती लागू केल्यानंतर काँग्रेसमधून नाराजीचा सूर उमटला होता. मात्र, आता प्रत्यक्ष प्रभाग रचना झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. या नव्या रचनेमुळे पश्चिम नागपूर, उत्तर नागपूर मतदारसंघात काँग्रेसला फायदा होईल, असा अंदाज राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तर दक्षिण-पश्चिम व पूर्व नागपुरात भाजपचा गड अधिक मजबूत होईल. दक्षिण नागपुरात भाजपसमोर तर मध्य नागपुरात काँग्रेससमोर तगडे आव्हान असेल, असे प्राथमिक चित्र आहे.
पश्चिम नागपुरात एकूण २४ नगरसेवक होते. आता ते २५ राहतील. सद्यस्थितीत पश्चिम नागपुरात काँग्रेसचे सात नगरसेवक होते. त्यापैकी गार्गीचोपडा यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपचा हात धरला. भाजपचे १७ नगरसेवक आहेत. नव्या प्रभाग रचनेनंतर प्रभाग १६, १७, २१ मध्ये काँग्रेस अधिक मजबूत झाली आहे. १८, १९, २० मध्ये भाजपला तगडी टक्कर मिळेल.
प्रभाग ३६ मध्ये दबदबा कायम राहील तर प्रभाग ३७ मध्येही टफ फाईट होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. उत्तर नागपुरात २४ पैकी काँग्रेसचे ७, बसपाचे १० तर भाजपचे ७ नगरसेवक आहे. प्रभाग २, ३, १४, १५ या प्रभागांमध्ये काँग्रेसला चांगल्या यशाची अपेक्षा आहे. प्रभाग १, ४, १० मध्ये भाजपला झुकते माप मिळेल, असा अंदाज आहे. तज्ज्ञांच्या मते बसपालाही या रचनेचा फायदा होईल.
दक्षिण-पश्चिममध्ये २४ पैकी भाजपचे २१ नगरसेवक आहेत. नव्या रचनेत या प्रभागातील नगरसेवकांची संख्या वाढून एकूण २७ झाली आहे, तर प्रभागात जवळपास ७० टक्के जुना भाग कायम आहे. प्रभाग ३५, ३६, ३९, ४०, ४१, ५२ हे भाजपचे गड आणखी पक्के होतील, असे मानले जात आहे. तर प्रभाग ३८ मध्ये काँग्रेस पुन्हा वरचढ ठरेल. प्रभाग ४२ मध्ये टफ फाईट होईल, असा अंदाज आहे.
पूर्व नागपुरात एकूण २८ नगरसेवक आहेत. नव्या रचनेत २ ने वाढून ३० झाले आहेत. सध्या भाजपचे २४ नगरसेवक, काँग्रेसचे तीन व राष्ट्रवादीचे एक नगरसेवक आहेत. नव्या रचनेत प्रभागात ४० टक्के बदल झाला आहे. मात्र, या बदलाने नुकसान होणार नाही, असा भाजपचा दावा आहे.
दक्षिणमध्ये मामला टफ
- दक्षिण नागपुरात एकूण २५ नगरसेवक आहेत. भाजपचे २१ तर काँग्रेस व शिवसेनेचे प्रत्येकी २ नगरसेवक आहेत. नव्या रचनेत या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बदल झाले असून एकूण १० प्रभाग झाले आहेत. येथून २८ नगरसेवक राहतील. गेल्या निवडणुकीत भाजपसाठी ‘गेम चेंजर’ ठरलेल्या या मतदारसंघात भाजप-काँग्रेसमध्ये ‘टफ फाईट’असे चित्र आहे. काँग्रेससमोर बसपाचे मोठे आव्हान असेल. शिवसेनेच्या नेत्यांचा अधिक कस लागेल, असे प्राथमिक चित्र आहे.
मध्य नागपुरात भाजप जोशात
- मध्य नागपुरात एकूण २३ नगरसेवक आहेत. सद्यस्थितीत भाजपचे १६ तर काँग्रेसचे ६ नगरसेवक आहेत. नव्या रचनेत बहुतांश प्रभागात २० ते २५ टक्केच टक्केच बदल झाला आहे. मोमिनपुराची दोन भागात विभागणी झाली असून प्रभाग २४ हा पूर्णपणे नवा प्रभाग तयार झाला आहे. प्रभाग क्रमांक १२, २२, २४, २५ मध्ये भाजप मुसंडी घेईल, असा अंदाज आहे.