डोनाल्ड ट्रम्पसारखे राजकीय नेते दहशतवाद्यांहून धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:28 AM2018-01-12T00:28:33+5:302018-01-12T00:30:46+5:30
उत्तर कोरिया व अमेरिका यांच्यामध्ये वातावरण तापले असून या दोघांच्या भांडणात जग अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर उभे ठाकले आहे. अण्वस्त्रसंपन्न देशांमधील शस्त्रांचे नियंत्रण हे तेथील नेत्यांच्या हाती आहे. त्यामुळेच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखे राजकीय नेते हे दहशतवाद्यांपेक्षा अधिक धोकादायक झाले आहेत, या शब्दांत अमेरिकन विद्यापीठातील इतिहासाचे प्रोफेसर, लेखक व न्यूक्लिअर स्टडीज् इन्स्टिट्यूटचे संचालक पीटर कुझनिक यांनी राजकारण्यांवर टीका केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उत्तर कोरिया व अमेरिका यांच्यामध्ये वातावरण तापले असून या दोघांच्या भांडणात जग अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर उभे ठाकले आहे. अण्वस्त्रसंपन्न देशांमधील शस्त्रांचे नियंत्रण हे तेथील नेत्यांच्या हाती आहे. त्यामुळेच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखे राजकीय नेते हे दहशतवाद्यांपेक्षा अधिक धोकादायक झाले आहेत, या शब्दांत अमेरिकन विद्यापीठातील इतिहासाचे प्रोफेसर, लेखक व न्यूक्लिअर स्टडीज् इन्स्टिट्यूटचे संचालक पीटर कुझनिक यांनी राजकारण्यांवर टीका केली.
पीटर कुझनिक हे सपत्निक नागपूर दौऱ्यावर असून त्यांनी विविध महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. टिळक पत्रकार भवनात त्यांनी गुरुवारी ‘मीट द प्रेस’च्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग ऊन व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अपरिपक्वतेमुळे जगात युद्धाचे ढग दाटले आहे. जगात आजच्या घडीला १४ हजार ७०० आण्विक शस्त्रे आहेत. यापैकी ९३ टक्के शस्त्रे ही अमेरिका व रशिया यांच्या ताब्यात आहेत. हिरोशिमा व नागासाकी येथील संहार अजूनही लोक विसरलेले नाहीत. आता जर आण्विक युद्ध झाले तर त्याहून कितीतरी अधिक पटींनी नुकसान होईल व लाखो लोक एका क्षणात बेचिराख होतील, अशी भीती कुझनिक यांनी व्यक्त केली. यावेळी कामगारनेते जे.नारायण राव हेदेखील उपस्थित होते.
ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे दुर्दैव
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा व्यक्ती अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो, हे दुर्दैवच आहे, अशी खंत कुझनिक यांनी बोलून दाखविली. ट्रम्प यांची लोकप्रियता प्रचंड घटली आहे. अगदी त्यांच्याच रिपब्लिकन पक्षातदेखील त्यांच्या विरोधात नाराजी आहे. ते मानसिकरीत्या आजारी असल्याचे वैज्ञानिक अभ्यासातून पुढेदेखील आले आहे. त्यांना विजयी करण्यासाठी रशियातून पैशांचा पुरवठा झाला होता. त्यांची एकूण कारकीर्द लक्षात घेता पुढील निवडणुकांत ‘रिपब्लिक’ पक्षाचा सफाया होईल, असा अंदाज पीटर कुझनिक यांनी वर्तवला.
जगातील निवडणुकांत अमेरिकेचा हस्तक्षेप
अमेरिकेच्या ‘सीआयए’ व इतर गुप्तचर संस्थांकडून इतर देशांमध्ये हस्तक्षेप जास्त प्रमाणात वाढला आहे. जगातील जवळपास सर्वच देशांमधील निवडणुकांत या संस्थांचा हस्तक्षेप असतो व राजकीय पटलांवरील बदलदेखील ते घडवून आणत असतात, असा आरोप कुझनिक यांनी केला.