न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभमीवर राजकीय पक्ष ‘अलर्ट’, निवडणुकीसाठी सज्ज असल्याचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2022 12:04 PM2022-05-05T12:04:27+5:302022-05-05T12:08:33+5:30
दोन आठवड्यांत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
नागपूर : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. दोन आठवड्यांत राज्यातील प्रलंबित महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर कोणत्याही क्षणी महापालिका निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता विचारात घेता सर्वच राजकीय पक्ष अलर्ट झाले आहेत. निवडणुकीसाठी सज्ज असल्याचा दावा प्रमुख पक्षांनी केला आहे.
ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकारने नवीन विधेयकाद्वारे कायदा मंजूर करत राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार स्वत:कडे घेतले. राज्य सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते, त्या याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायलयाने निकाल दिला आहे. यात दोन आठवड्यांत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मनपा प्रशासनाला निवडणूक आयोगाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. निवडणूक होणार असल्याची प्रशासनात चर्चा आहे.
काँग्रेस आधीपासूनच सज्ज
महापालिकेत मागील १५ वर्षापासून भाजपची सत्ता आहे. कामे झाली नसल्याने शहरातील नागरिक त्रस्त आहे. जनतेपुढे कोणते मुद्दे मांडायचे याची शहर काँग्रेस कमिटीने आधीच तयारी केली आहे. आम्ही निवडणुकीसाठी सज्ज असून मतदार भाजपला मनपातून हद्दपार करतील. यावेळी सत्तापालट होईल व काँग्रेसचा झेंडा फडकेल.
आमदार विकास ठाकरे, शहर अध्यक्ष काँग्रेस
मिशन १२० पूर्ण करणार
ओबीसी आरक्षण कायम राहण्यासाठी बाजू मांडण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. भाजप हा संघटना व कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आम्ही सदैव निवडणुकीसाठी सज्ज असतो. अगामी मनपा निवडणुकीत ‘मिशन १२० ’ पूर्ण करू
आमदार प्रवीण दटके, शहर अध्यक्ष भाजप
पक्षाची जय्यत तयारी
महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जय्यत तयारी केली आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या बैठका सुरू आहे. काँग्रेसकडून प्रस्ताव आला तर आघाडीत नाही तर स्वबळावर निवडणूक लढणार आहोत. विभागनिहाय बैठकीत निवडणुकीचे नियोजन सुरू आहे. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
दुनेश्वर पेठे, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस