महाराजबागेच्या बचावासाठी सरसावले राजकीय पक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 08:39 PM2018-12-07T20:39:53+5:302018-12-07T20:51:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने ३ डिसेंबरला महाराजबागेची मान्यता रद्द करण्याचा मेल डॉ. पंजाबराव देशमुख कृषी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने ३ डिसेंबरला महाराजबागेची मान्यता रद्द करण्याचा मेल डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला पाठविला. यानंतर नागपूरकरांच्या संतप्त प्रतिक्रिया पुढे येऊ लागल्या. महाराजबागेशी निगडित असलेल्या सामाजिक संघटनांनी न्यायालयाची पायरी चढण्याचा निर्णय घेतला. ज्याच्या त्याच्या तोंडातून महाराजबाग बंद होऊ नये, असे वक्तव्य येऊ लागले. शासन, विद्यापीठ यांच्याविरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्या. महाराजबागेच्या बचावासाठी आता राजकीय पक्षही सरसावल्याने महाराजबागेच्या आंदोलनाला बळ मिळाले आहे. नागपूरकरांकडूनही या आंदोलनाला समर्थन मिळत आहे.
महाराजबाग बंद होऊ देणार नाही - शिवसेना
नागपूरचे हृदय असलेले, १२५ वर्षे जुने महाराजबाग प्राणिसंग्रहालय कोणत्याही परिस्थितीत बंद होऊ देणार नाही, वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी खासदार प्रकाश जाधव यांनी डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना दिला.
महाराजबाग प्राणिसंग्रहालयाची मान्यता केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने रद्द केल्याने नागपूरकरांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे़ शुक्रवारी दुपारी शेकडो शिवसैनिकांनी कृषी विद्यापीठावर धावा बोलत, महाराजबागेजवळ तीव्र निदर्शने केली़ ‘शिवसेनेची एकच पुकार, नही बंद होने देंगे महाराजबाग’, ‘महाराजबाग बेचने वालो को जुते मारो सालो को’, अशा घोषणा देऊन महाराजबाग परिसर दुमदुमुन टाकला होता़. प्राणिसंग्रहालयातून हा मोर्चा थेट पंजाबराव कृषी विद्यापीठात शिरला़ कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राणिसंग्रहालयाचे नियंत्रक डॉ़ एऩ डी़ पालार्वार यांना खाली बोलवा, असा इशारा शिवसैनिकांनी प्रशासनाला दिला़ त्यानंतर, पोलिसांच्या मध्यस्थीने पालार्वार यांनी भेट घेतली़ प्रकाश जाधव यांनी, प्राणिसंग्रहालय बंद करण्यामागे राजकीय षडयंत्र आहे का, प्राणिसंग्रहालयासाठी केंद्र सरकारकडे कितीवेळा पाठपुरावा केला, प्राधिकरणाने सुचविलेल्या अटींची पूर्तता का केली नाही, असा सवाल करीत याकरिता विद्यापीठच जबाबदार असल्याचा आरोप प्रकाश जाधव यांनी केला़
याप्रसंगी शिवसेनेचे सूरज गोजे, नितीन तिवारी, गुड्डू रहांगडाले, रवनीश पांडे, राजू तुमसरे, हितेश यादव, समीर पालकर, गजानन आकरे, नत्थूलाल दारोटे, रमेश मोरे, किशोर राठोड, प्रवीण दिकोंडवार, नितीन साळवे, मुन्ना शुक्ला, रजत देशमुख, विकास आंबोरे, राम कुकडे, दिगंबर ठाकरे, मनोज शाहू, पुरुषोत्तम कांद्रीकर, दीपक काळपांडे, विक्रम राठोड, अश्रय मेश्राम यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते़
या आंदोलन महाराजबाग आरोग्य आसन मंडळाचे अॅड. प्रमोद नरड, राजेश जरहगर, साबीर खान, निरंजन बिसने, बिपीन ठाकूर, टी.एन. वैद्य, अरुण मोरे, सुरेश हेडाऊ, रमेश मोरे, विनोद जाधव, आशिष चौरसिया, किशोर राठोड, नितीन साळवे, शामराव इरपाते, रवी हारगुडे, किशोर ठाकरे, मनीष सराफ यांनीही समर्थन दिले होते.
तर आम्ही जावे कुठे? - युवक काँग्रेसचा सवाल
महाराजबागेच्या बचावासाठी युवक काँग्रेसच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. वन्यप्राण्यांचे मुखवटे लावून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महाराजबाग परिसरात आंदोलन करीत, सांगा आम्ही जावे कुठे? असा सवाल महाराजबाग प्रशासनाला केला. कार्यकर्त्यांनी यावेळी प्रचंड घोषणाबाजी देत, महाराजबागेच्या बचावासाठी शेवटपर्यंत लढा देण्याचा संकल्प केला. ‘नही चलेंगी नही चलेंगी, तानाशाही नही चलेंगी’ अशा घोषणा सरकार आणि महाराजबाग प्रशासनाच्या विरोधात दिल्या. नगरसेवक बंटी शेळके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी युवक काँग्रेसचे महेश बालपांडे, आकाश गुजर, रोनाल्ड मेश्राम, जॉन अगस्टिन, वसिम खान, हिमांशू मेश्राम, अधिकांश मेश्राम, शाहीद खान, फजलूर रेहमान कुरेशी, अजहर शेख, आकाश चौरीया, तुषार मदने, निखिल कापसे, तनवीर अहमद विद्रोही, तौसिफ खान उपस्थित होते.
मुळात महाराजबागेची जागा ही शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. त्या जागेवर सरकारचे लक्ष आहे. त्यामुळे वारंवार महाराजबागेला कुठल्या तरी माध्यमातून कचाट्यात पकडण्याचे काम प्रशासन करीत आहे. महाराजबाग हे पर्यावरण संतुलनाचे केंद्र आहे. शहराच्या मध्यभागी आहे. हे निव्वळ मनोरंजनाचे केंद्र नसून, आजच्या शहरी विद्यार्थ्यांना निसर्गाचा वन्य जीवांचा अनुभव करून देणारे केंद्र आहे. त्याची निगा राखल्या गेली पाहिजे.
हरीश धुरट, कामगार नेते
महाराज बाग ही नागपूरची शान आहे. पण जी यंत्रणा महाराज बागेला संचालित करते, त्या यंत्रणेने गांभीर्याने महाराज बागेकडे बघितलेच नाही. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने त्यांच्या निकषात जे बसत नाही, त्यावर बोट दाखवून मान्यता रद्द केली आहे. मुळात जबाबदारी स्वीकारणाऱ्यांनीच त्याला गांभीर्याने घेतले असते, तर ही वेळ आली नसती.
अशोक मोखा, सदस्य, लोकमत एडिटोरियल बोर्ड
विकासाच्या नावावर इतिहास पुसल्या जाऊ नये. ज्या इतिहासामुळे पिढी घडते, नीतीमूल्याची जोपासना केली जाते, त्याचे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न सरकारद्वारे होत आहे. महाराजबागेने आपल्याला व आजच्या विद्यार्थ्यांना निसर्गावर प्रेम करा, पशुपक्ष्यांवर प्रेम करा शिकविले आहे. आज शहरातील विद्यार्थी निसर्गापासून दूर झाले आहे. त्यांना महाराजबागेत वन्य प्राणी, वेगवेगळ्या वनस्पती बघायला मिळतात. त्यांचे एक वेगळे आकर्षण मुलांमध्ये आहे. त्यामुळे या वास्तूचा बळी जाऊ नये, हे समाजाचे संस्कार केंद्र आहे.
भाऊ दायदार, माजी संचालक, राष्ट्रीय सेवा योजना
महाराजबागेला मान्यता देणारे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण आहे आणि मान्यता रद्द करणारेही तेच प्राधिकरण आहे. ज्या निकषामुळे महाराजबागेची मान्यता रद्द केली गेली, त्यासाठी केंद्रीय प्राधिकरणाचीच चुकी आहे. २०११ ला डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाक डून मास्टर प्लॅन पाठविला होता. तो दोनवेळा दुरुस्तही करण्यात आला. सुनावणीही झाली. मास्टर प्लॅनला मंजुरी न देता थेट मान्यता रद्द करणे हे चुकीचे आहे. प्राधिकरणाने पहिले मान्यता द्यायला हवी होती. नूतनीकरणासाठी संधी द्यायला हवी होती. त्यानंतर जर विद्यापीठाकडून काहीच झाले नसते तर मान्यता रद्द करणे योग्य होते.
विजय सालनकर, सदस्य, लोकमत अॅडव्हायझरी बोर्ड