राजकीय पक्षच समाजात भेद पाडतात
By Admin | Published: July 9, 2016 03:05 AM2016-07-09T03:05:06+5:302016-07-09T03:05:06+5:30
जाती ही विकृती आहे, त्यामुळे मोठे सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यात देश भरडला जात आहे.
भय्याजी जोशी : अस्पृश्यता हा समाजातील मानसिक आजार
नागपूर : जाती ही विकृती आहे, त्यामुळे मोठे सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यात देश भरडला जात आहे. वर्तमानात या सामाजिक प्रश्नांना राजकीय रूप येत आहे. देशातील कुठलाही राजकीय पक्ष जाती, वर्ण व्यवस्थेला दूर करू शकत नाही. उलट राजकीय पक्षांचा स्वभाव हा समाजात भेद पाडण्याचा आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी एका कार्यक्रमात केली.
भारत मंगलम या संस्थेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त व रा.स्व.संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘सामाजिक समरसता’ या विषयावर भय्याजी जोशी यांच्या व्याख्यानाचे आयोजन शुक्रवारी संत रविदास सभागृहात करण्यात आले होते. यावेळी जोशी यांनी राजकीय पक्षांवर कडाडून टीका केली. राजकीय पक्ष सामाजिक प्रश्न दूर करण्याऐवजी ते टिकून कसे राहतील हाच प्रयत्न करतात. त्यामुळेच ते जातीचे गणित मांडतात. सामाजिक प्रश्न हे समाजानेच सोडवायचे आहे. राजकीय पक्षांकडून सामाजिक समरसतेची अपेक्षाच करू नये.
जोशी यावेळी म्हणाले की, ईश्वर एक शक्ती आहे. मूर्तीतर तुम्हीआम्ही घडविल्या आहेत. जगाच्या कल्याणाचा जो विचार करतो तोच खरा ईश्वरनिष्ठ आहे. या ईश्वरनिष्ठ मंडळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बाळासाहेब देवरस आहेत. कालप्रवाहात अनेक गोष्टी विसंगत होत गेल्या. तत्त्वज्ञान हे ग्रंथातच राहिले. तत्त्व आणि व्यवहारात अंतर पडले. त्यातून रुढी, परंपरा, कर्मकांड प्रस्थापित झाले. यालाच लोक धर्म समजू लागले. तत्त्वाशी विसंगत करणारा समाज होत गेला. त्यामुळे समाजात भेद निर्माण झाले. जाती, उपजाती निर्माण झाल्या आणि त्या समाजाच्या अंतर्मनात खोलवर रुजल्या. त्यातूनच अस्पृश्यता हा शब्द उदयास आला. अस्पृश्यता ही आजारासारखी समाजात पसरली. ही अस्पृश्यता, जाती व्यवस्था समाजावर लागलेला काळा डाग आहे. ते दूर करण्याचे काम समाजानेच करायचे आहे. त्यासाठी मानसिकता तयार करण्याची गरज आहे. ही जाती व्यवस्था, अस्पृश्यता संपविण्यासाठी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजनैतिक क्षेत्रातील विषमता संपविल्या पाहिजे. सर्वांना समान विकासाच्या संधी दिल्या पाहिजे.
समान संधीचा विचार करताना, जो मागे आहे, त्याला काही विशेष संधी द्यायला पाहिजे. समाजात मागे राहिलेला वर्ग एकाच रेषेत आल्यास तरच देशात सामाजिक समरसता निर्माण होईल, असे मत जोशी यांनी व्यक्त केले.
समाज जीवन सुधारण्यासाठी १८०० ते १९०० या काळात देशात अनेक सुधारकांची मालिकाच उभी राहिली. परंतु या सुधारकांना जातीत विभागून टाकले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा समाज पुन्हा बांधण्याचा प्रयत्न करीत आहे. जाती व्यवस्थेला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. अशा व्यवस्थेवर समाज जीवन जगू शकत नाही, अशी भूमिका संघाचीआहे. व्याख्यानाला मुख्य अतिथी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चिचोलीचे संजय पाटील, भारत मंगलमचे अध्यक्ष गिरीश हरकरे, कार्याध्यक्ष संतोष माहूरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष माहूरकर यांनी केले. आभार दीपक काळी यांनी मानले. (प्रतिनिधी)