Maharashtra Assembly Election 2019 : राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहिता पाळावी : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 22:22 IST2019-09-23T22:21:35+5:302019-09-23T22:22:29+5:30
नागपूर जिल्ह्यातील आदर्श आचारसंहितेचे काटेकोर अंमलबजावणी करण्याकरिता सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.

Maharashtra Assembly Election 2019 : राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहिता पाळावी : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील आदर्श आचारसंहितेचे काटेकोर अंमलबजावणी करण्याकरिता सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ च्या अनुषंगाने सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली बचतभवन सभागृह येथे सोमवारी आढावा बैठक घेण्यात आली.
राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी स्थानिक पोलीस प्राधिकाऱ्यांना प्रस्तावित सभांची जागा, कामाची वेळ याबाबत पुरेशी आगावू सूचना देऊन आवश्यक ती परवानगी घ्यावी. प्रस्तावित सभेच्या जागी कुणाचेही निर्बंध किंवा प्रतिबंध आदेश जारी केलेले असल्यास त्याचे पूर्णपणे पालन करावे. पक्षाची मिरवणूक काढतानाही वाहतूकीचे नियम पाळावे. मिरवणुकीमुळे अडथळा होऊ देऊ नये.
सत्ताधारी पक्ष, शासन यांनी केलेल्या कामगिरीविषयी सरकारी राज्यकोषातील खर्चाने कोणतीही जाहिरात व सर्व जाहिराती काढण्यास प्रतिबंध आहे. मतदाराला पैशाचे किंवा अन्य कशाचेही प्रलोभन दाखवू नये. मतदारांच्या जातीय समूह भावनांना आवाहन करू नये. इतर पक्ष किंवा त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर, आंधळेपणाने केलेले आरोप आणि विपर्यस्त माहिती यांच्या आधारावर टिकाटिपणी करू नये. लोकांच्या मतांचा किंवा त्यांच्या कामांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या घरासमोर निदर्शने किंवा धरणे यांचा कोणत्याही परिस्थितीत अवलंब करू नये. मिरवणुकीतील लोक क्षेपणास्त्र किंवा शस्त्र म्हणून ज्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो अशा कोणत्याही वस्तू जवळ बाळगू नये. निवडणुकीच्या काळात मद्यवाटप केल्या जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा तसेच सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.