राजकीय पक्षांना मिळणार शेतकऱ्यांचे आव्हान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 11:51 PM2018-03-31T23:51:42+5:302018-03-31T23:51:59+5:30

Political parties will face challenges of farmers | राजकीय पक्षांना मिळणार शेतकऱ्यांचे आव्हान 

राजकीय पक्षांना मिळणार शेतकऱ्यांचे आव्हान 

googlenewsNext
ठळक मुद्देनवीन राजकीय पर्याय देणार : शेतकरी नेते व बुद्धिजीवींचे मंथन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकरी विरोधी धोरण राबवणाऱ्या भाजपा-काँग्रेसला दूर ठेवत येणाऱ्या २०१९ च्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचे खरे प्रतिनिधी विधानसभेत निवडून जावेत, यासाठी नवीन राजकीय पर्याय देण्याबाबत शनिवारी नागपुरात शेतकरी नेते व बुद्धिजींवीची महत्त्वाची बैठक पार पडली. याबैठकीत नवीन राजकीय पर्याय देण्यावर बहुतांश नेत्यांनी सहमती दर्शविली.
लोकजागर अभियानच्यावतीने शनिवारी राष्ट्रभाषा सभा, वोक्हार्ट हॉस्पिटलच्या मागे, शंकरनगर चौक येथे राज्यातील काही निवडक शेतकरी नेते, पत्रकार व बुद्धिजीवींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शेतकरी नेते विजय जावंधिया, चंद्रकांत वानखडे, अमर हबीब, प्रा. शरद पाटील, प्रा. ज्ञानेश वाकुडकर, श्रीकांत तराळ, राम नेवले, अमिताभ पावडे, विजय देशमुख, महादेव मिरगे, प्रा. संजय वानखेडे, गजानन अमदाबादकर, नारायण जांभुळे, डॉ. वसंत शिरभाते, राम घोडे, देवीदास लांजेवार यांच्यासह वेगवेगळ्या परिसरांमध्ये शेतकरी संघटनेचे काम करणारे तरुणकार्यकर्ते उपस्थित होते.
‘मी एक मतदार आहे. पण काँग्रेस, भाजपला मी मतदान करू शकत नाही. त्यामुळे मतदानासाठी पर्याय असावा. मी केलेले मतदान हे शेतकऱ्यांचे बळ वाढवणारे असावे. यासाठी राज्यभर पुणे, मुंबई, नाशिक आणि औरंगाबाद या ठिकाणी बैठक घेण्यात येणार असून त्या त्या भागातल्या शेतकरी नेत्यांना यात सहभागी केले जाईल, असा विश्वास ज्येष्ठ शेतकरी नेते अमर हबीब व्यक्त केला आहे.
'शंभर युवा आणि महाराष्ट्र नवा'
भाजप आणि काँग्रेसही शेतकऱ्यांचे शत्रू आहेत, नवीन राजकीय पर्याय देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ‘शंभर युवा आणि महाराष्ट्र नवा’ या नाऱ्यासह शेतकऱ्यांची मुले निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे लोकजगार अभियानाचे अध्यक्ष व या शेतकरी बैठकीचे आयोजक ज्येष्ठ कवी प्रा. ज्ञानेश वाकूडकर यांनी सांगितले. लवकरच शेतकरी नेते आणि तरुण शेतकरी कार्यकर्ते महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. यादरम्यान विभागीय स्तरावर बैठका घेण्यात येणार असून नवीन राजकीय पक्षाची घोषणाही लवकरच करण्यात येईल. राजकीय पर्याय म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची मुले निवडणूक लढणार आहेत. महाराष्ट्रातील सर्व २८८ जागा लढवल्या जातील. यात १०० युवा महाराष्ट्र नवा' या घोषणेप्रमाणे १०० जागांवर तरुण निवडणूक लढवतील. लोकसभा निवडणुकीतही काही जागांवर उमेदवार उभे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Political parties will face challenges of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.