राजकीय पक्षाने आपले स्वत:च हॉस्पिटल उभे करावे : डॉ. बोधनकर यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 01:41 AM2020-09-24T01:41:38+5:302020-09-24T01:42:52+5:30
कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारासाठी खासगी डॉक्टरांना जबाबदार धरले जात आहे. लोकप्रतिनिधींच्या चुकांचे खापर दुसऱ्यांच्या माथी मारण्याचा हा प्रकार थांबवायला हवा, असे मत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारासाठी खासगी डॉक्टरांना जबाबदार धरले जात आहे. लोकप्रतिनिधींच्या चुकांचे खापर दुसऱ्यांच्या माथी मारण्याचा हा प्रकार थांबवायला हवा, असे मत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ज्या सामान्य कार्यकर्त्याचे संपूर्ण आयुष्य पक्षासाठी काम करण्यात गेले, त्यांच्या व त्यांच्या नातेवाईकांसाठी गरजेच्या वेळी किमान एखादी खाट आणि आरोग्य सेवा तरी उपलब्ध व्हावी, यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने जिल्हा पातळीवर आपले स्वत:चे एक हॉस्पिटल उभारण्याची गरज आहे.
‘लोकमत’शी बोलताना डॉ. बोधनकर यांनी मेयो, मेडिकलच्या वास्तव स्थितीकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, ही दोन्ही रुग्णालये गरीब व सामान्य रुग्णांसाठी आशेचे केंद्र आहे. परंतु स्थापनेनंतर या रुग्णालयाच्या विकासाकडे फारसे लक्ष देण्यात आले नाही. यामुळे ८० टक्के रुग्णांचा भार खासगी हॉस्पिटलना सांभाळावा लागतो आहे. आजही कोणी लोकप्रतिनिधी आजारी पडला तर त्यांची धाव खासगी हॉस्पिटलकडेच असते. सध्याच्या स्थितीत कोविड पॉझिटिव्ह आलेले नेते खासगीमध्येच उपचार घेताना दिसून येत आहेत. यावरून शासकीय रुग्णालयाची व्यथा दिसून येते. सध्या कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासकीयसह खासगीमध्ये खाट मिळणे कठीण होत चालले आहे. आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नेत्यांचीही दमछाक होत असल्याचे चित्र आहे. भविष्यात असे होऊ नये म्हणून, आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज आहे. जसे निवडणूक आले की, आपल्या पक्षाचे कार्यालय हे मतदारांची सेवा करण्यासाठी दिले जाते, तसेच या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे हॉस्पिटल जरूर बांधावे. शिवसेना हॉस्पिटल, राष्ट्रवादी हॉस्पिटल, काँग्रेस हॉस्पिटल, भाजप हॉस्पिटल, मनसे हॉस्पिटल, शेकाप हॉस्पिटल, आरपीआय हॉस्पिटल, वंचित बहुजन हॉस्पिटल, एमआयएम हॉस्पिटल, बसपा हॉस्पिटल, प्रहार हॉस्पिटल, आम आदमी हॉस्पिटल उभे करावे. ज्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात असे अद्ययावत सुविधांनी सुसज्ज सर्व पक्षांचे हॉस्पिटल स्थापन होतील. त्यांच्या कार्यकर्त्यांना व गोरगरिबांना मोफत उपचार उपलब्ध होतील. तो दिवस भारतीय राजकारणातील खरा सुवर्ण दिवस असेल. राजकीय पक्षांना, खरेच मतदारांची काळजी असेल तर कोरोना हॉस्पिटल उभारून सेवा करून दाखवा, असे आवाहनही त्यांनी केले.