राज्यात राजकीय प्रदुषण वाढलेय, राजकारणातील सगळेच असूर नाही; CM शिंदेंचा रोख कुणाकडे?
By योगेश पांडे | Published: December 1, 2023 10:10 PM2023-12-01T22:10:47+5:302023-12-01T22:11:28+5:30
नागपुरात आयोजित खासदार सांस्कृतिक महोत्सवात मुख्यमंत्री उपस्थित झाले होते. यावेळी त्यांनी राजकीय चिमटे काढले.
नागपूर: मागील काही काळापासून वातावरणातील प्रदुषण व सांस्कृतिक प्रदुषणावर चर्चांना उधाण आले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकारणावर मोठे भाष्य केले. राज्यात राजकीय प्रदुषण वाढले असून राजकारणातील सगळेच व्यक्ती मात्र असुर नसतात असे वक्तव्य त्यांनी केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी राजकीय प्रदुषणाचा मुद्दा काढला. त्यांच्या बोलण्याचा रोख नेमका महाविकास आघाडीतील कोणत्या नेत्यांकडे होता अशाच चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
नागपुरात आयोजित खासदार सांस्कृतिक महोत्सवात मुख्यमंत्री उपस्थित झाले होते. यावेळी त्यांनी राजकीय चिमटे काढले. एकीकडे कलाकार-गायक पियुष मिश्रा यांनी गाण्यातून राजकारणावर हळूवार प्रहार केले. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी थेटच प्रदुषणाच्या मुद्द्याला हात घातला. मी व उपमुख्यमंत्री वेगवेगळ्या पक्षात असलो तरी आमचे सूर एकच आहेत. नागपुरचे सुपूत्र नितीन गडकरी व फडणवीस हे दोघेही चांगले कलाकार आहेत. राजकारणात सारेच असूर नसतात.
काही यांच्यासारखी सुरेल माणसेदेखील असतात. गडकरी यांच्यासारखे नेते राजकारणातील प्रदुषण हलकेफुलके बोलून दूर करण्याचा प्रयत्न करतात. ते दर्दी खवय्ये असले तरी त्यांचे बोलणे हे सावजी रस्स्यासारखे झणझणीत असते. त्यांचा आग्रह आमच्यासाठी प्रेमाचा आदेश असतो. केवळ मेट्रो, पायाभूत सुविधा या विकासात्मक बाबींकडे लक्ष न देता राज्याची परंपरा व संस्कृतीदेखील जपणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक कलावंतांना तसा मंच प्रदान करणे गरजेचे आहे, असेदेखील मुख्यमंत्री म्हणाले.