वीज थकबाकीवरून आजी-माजी ऊर्जामंत्र्यांमध्ये जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2022 11:56 AM2022-03-17T11:56:27+5:302022-03-17T12:12:07+5:30
दोन नागपूरकर नेत्यांमध्ये रंगलेला कलगीतुरा चर्चेत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वीज थकबाकीच्या विषयावरून ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. भाजपच्या काळात बावनकुळे ऊर्जामंत्री होते. तर महाविकास आघाडी सरकारमध्ये राऊत हा भार वाहत आहेत. दोन्ही नेत्यांना या विभागातील इत्थंबूत माहिती आहे. त्यामुळे या दोन नागपूरकर नेत्यांमध्ये रंगलेला कलगीतुरा चर्चेत आहे.
महावितरण कंपनीची ग्राहकांवर प्रचंड थकबाकी असल्याने कंपनीची दुरवस्था झाली आहे. कंपनी टिकवायची असेल तर ही थकबाकी वसूल केल्याशिवाय पर्याय नाही, असे महावितरणतर्फे सातत्याने सांगितले जात आहे. मंगळवारी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीसुद्धा विधानसभेत महावितरणच्या दुरवस्थेचा पाढा वाचला. महावितरण कंपनीची ग्राहकांवर तब्बल ६४ हजार कोटीची थकबाकी वाढली असल्याचे सांगितले. यातच थकबाकीमुळे शेतकऱ्यांचे कृषिपंपाचे कनेक्शन तोडले जात असल्याच्या मुद्द्यावर मात्र त्यांनी दोन पावले मागे येत कृषी वीज कनेक्शन तोडण्यास तीन महिन्यांची स्थगिती दिली.
ऊर्जामंत्र्यांच्या या घोषणेवर माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिमटा काढला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, फडणवीस सरकारच्या काळात आम्ही तब्बल ४५ लाख शेतकऱ्यांना वीज दिली. पाच वर्षांत २५ हजार कोटींची वीज दिली. एक पैसाही घेतला नाही. एकाही शेतकऱ्याची वीज कापली नाही. इतके करूनही आमच्या सरकारमध्ये वीज कंपनी तेव्हा ४७१५ कोटीने नफ्यात होती. या सरकारच्या काळात थकबाकी वाढली. शेतकरी कायम अडचणीत आहे. आत्महत्या होत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची वीज कापली जाऊ नये. आमचे सरकार आले तर आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ, असेही ते म्हणाले.