राऊत-केदार मैत्री फुलली, समित्या मात्र कोमेजलेल्याच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 10:18 AM2022-01-07T10:18:26+5:302022-01-07T10:35:41+5:30
पालकमंत्री नितीन राऊत(Nitin Raut) व क्रीडा मंत्री सुनील केदार(Sunil Kedar) यांच्या दोस्तीचे किस्से सध्या जिल्ह्यात चर्चेत आहेत. असे असले तरी केदार यांच्या मतदारसंघातील सावनेर व कळमेश्वर तालुक्यातील शासकीय समित्यांवर अद्याप पालकमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केलेले नाही.
नागपूर : एकमेकांचा राजकीय गेम करण्यासाठी धडपड करणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील दोन मंत्र्यांची मैत्री सध्या चांगलीच फुलली आहे. पालकमंत्री नितीन राऊत(Nitin Raut) व क्रीडा मंत्री सुनील केदार(Sunil Kedar) यांच्या दोस्तीचे किस्से सध्या जिल्ह्यात चर्चेत आहेत. असे असले तरी केदार यांच्या मतदारसंघातील सावनेर व कळमेश्वर तालुक्यातील शासकीय समित्यांवर अद्याप पालकमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केलेले नाही.
तालुक्यातील प्रशासकीय कामाला गती देण्यासाठी, तसेच सर्वसामान्य माणसांचे प्रश्न तत्काळ सोडविण्यासाठी प्रशासकीय समित्या महत्त्वाच्या असतात. मात्र, सावनेर व कळमेश्वर तालुक्यातील संजय गांधी निराधार समिती, तालुका समन्वय समिती, दक्षता समिती यापैकी एकही समिती स्थापन झालेली नाही. यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भरवशावरच कारभार सुरू असून राजकीय पातळीवर सक्रिय राहणाऱ्या कार्यकर्त्यांचा हिरमोड होत आहे.
विशेष कार्यकारी अधिकारीही रखडले
- आपली विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती व्हावी, अशी सर्वसामान्य राजकीय कार्यकर्त्याची अपेक्षा असते. जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघात विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या यादीवर पालकमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. सावनेर मतदारसंघातील यादी मात्र अद्याप मंजूर झालेली नाही. या दोन्ही मंत्र्यांच्या मैत्रीचा आम्हालाही फायदा व्हावी, अशी अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
- दुनियादारीने जुळली दोस्ती
- राऊत- केदार यांची लोकसभा निवडणुकीपूर्वी घट्ट मैत्री होती. त्यावेळी राऊत यांना रामटेक लोकसभेतून लढविण्यासाठी केदार यांनी दिल्लीपर्यंत पंगा घेतला.
- यानंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत ही दोस्ती टीकली. नंतर राऊत-केदार दोघेही निवडून येताच मंत्रिपदाची शर्यत सुरू झाली. राऊत पालकमंत्री झाले ही बाब केदार समर्थकांना खटकली. तेथूनच दुरावा सुरू झाला.
- पुढे केदार यांना पालकमंत्री करा, असा आग्रह केदार समर्थकांनी धरला. यामुळे राऊत दुखावले.
- पालकमंत्री म्हणून राऊत यांनी बोलाविलेल्या बैठकांना जाणे केदार हे सातत्याने टाळत राहिले.
- शेवटी डिसेंबरमध्ये नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही मंत्र्यांनी ‘दुनियादारी’ला महत्त्व दिले व यातून जुनी दोस्ती पुन्हा एकदा फुलली.
-यापूर्वी झाले होते पत्र युद्ध
- समित्या स्थापन करण्यावरून यापूर्वी दोन्ही मंत्र्यांच्या कार्यालयांमध्ये पत्रव्यवहार झाला आहे. राऊत यांनी पत्र पाठवून केदार यांना यादी सादर करण्याची सूचना केली होती, तर केदार यांच्याकडून राऊत यांना पत्र पाठवून बैठक घेण्याचा सल्ला देण्यात आला होता.
- यानंतर राऊत यांनी बैठक घेण्यासाठी तारीख कळविण्याची सूचना देणारे पत्र केदार यांना पाठविले होेते. हा पत्रव्यवहार असाच सुरू राहिला, पण प्रत्यक्षात दोन्ही मंत्री समित्या स्थापन करण्यासाठी एकत्र बसले नाहीत.