भाजपमध्ये कोण करतंय ठाकरेंना ‘गुलाम’ करण्याचा प्रयत्न?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 11:23 AM2022-01-19T11:23:14+5:302022-01-19T11:37:24+5:30
आगामी महानगरपालिका निवडणुकीत सर्व मतभेद विसरून एकत्रितपणे लढण्याचे आवाहन मोठ्या नेत्यांनी केले असले तरी भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांमध्ये ‘मनभेद’च झाल्याचे चित्र आहे.
नागपूर : आगामी महानगरपालिका निवडणुकीत सर्व मतभेद विसरून एकत्रितपणे लढण्याचे आवाहन मोठ्या नेत्यांनी केले असले तरी भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांमध्ये ‘मनभेद’च झाल्याचे चित्र आहे. मनपाच्या सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी बहुजनांवर अन्याय करण्यात येत असून, कटकारस्थान करून आमच्यासारख्यांना गुलाम बनविण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे, असा आरोपच ‘सोशल’ माध्यमांतून केला आहे. त्यांचा रोख भाजपमधीलच पदाधिकाऱ्यांकडे असल्याची चर्चा पक्षाच्या गोटात असून, नेमके कुठले नेते त्यांना ‘गुलाम’ करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भाजपचे शहर उपाध्यक्ष रमेश भंडारी यांची श्यामनगर हनुमान सेवा समिती आणि माजी महापौर संदीप जोशी यांच्या सिद्धिविनायक सेवा ट्रस्टच्या माध्यमातून ठाकरे नगरसेवक असलेल्या प्रभाग ३५ मधील श्यामनगर परिसरात विविध शासकीय योजनांसाठी शिबिर घेण्यात आले. यात ठाकरे यांना निमंत्रण नव्हते. यामुळेच ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत आपली नाराजी व्यक्त केली. त्यांचा रोख जोशी व भंडारी यांच्यावरच असल्याची चर्चा आहे.
ठाकरे यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क केला असता मी पक्षावर नाराज नाही. ही पोस्ट मी खाजगी पातळीवर टाकली आहे. माझी नाराजी मला ज्यांना कळवायची होती, त्यांना ती या पोस्टमुळे समजली आहे, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. रमेश भंडारी व संदीप जोशी यांच्याशी संपर्क झाला नाही. या एकूणच प्रकारामुळे पक्षात ‘ऑल इज वेल’ नसल्याचेच चित्र समोर आले असून, आगामी निवडणुकांत पक्षाअंतर्गत चढाओढीचे आव्हान वाढण्याची चिन्हे आहेत.
कुठल्याही ओबीसीवर अन्याय नाही : दटके
पक्षात सर्व काही ठीक असून जातीभेदाला स्थान नाही. मी ओबीसी असून पक्षात आमच्यावर कोणताही अन्याय नाही. कोणाची काही तक्रार असेल तर त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करावी, असे शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके यांनी स्पष्ट केले.
ही आहे ठाकरेंची पोस्ट
महात्मा फुलेंचा संघर्ष हा कोणत्या व्यक्ती किंवा समाजाविरुद्ध नव्हता तर प्रवृत्तीविरुद्ध होता. आजही समाजामध्ये अशा प्रवृत्ती आहेत ज्यांना आमच्यासारख्या सर्वसामान्य बहुजनांनी मेहनतीने कमावलेले यश पचवता येत नाही. म्हणुनच मग कट कारस्थान करून आमच्या सारख्याला गुलाम बनवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. गुलामी स्वीकारली नाही म्हणुन स्वाभिमानाला ठेच पोहचवून प्रताडीत करण्याच षडयंत्र रचल्या जात आहे.