भाजपची वारी, काँग्रेस मतदार घरी; सेना, राष्ट्रवादी वारीसाठी शोधतेय कारभारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 03:34 PM2021-11-30T15:34:44+5:302021-12-01T10:20:38+5:30
भाजपच्या उमदेवाराला निवडून येण्यासाठी अपेक्षित मतदाराची त्यांनी चांगलीच आवभगत केली आहे. मात्र, काँग्रेसकडून वारी, सवारीची कुठलीही तडजोड दिसून येत नसल्याने कुठल्यातरी माध्यमातून आपलेही देवदर्शन व्हावे याच्या प्रतिक्षेत राष्ट्रवादी व सेनेचे मतदार आहेत.
नागपूर : विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदारांनी ठेवलेल्या अपक्षेवर पाणी फेरल्या जात असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराने आपल्या पक्षाच्या मतदारांना सहकुटुंब वारीला पाठविले आहे. मात्र, काँग्रेसच्या उमेदवाराकडून वारीबद्दल कुठलेही नियोजन नसल्याने काँग्रेसचे मतदार अजूनही घरीच आहे. यात मात्र चांगलीच घुसपट सेना व राष्ट्रवादीच्या मतदारांची झाली आहे. आम्ही महाविकास आघाडीचे मतदार असा ऐब मारणारे सेना राष्ट्रवादीच्या मतदारांना काँग्रेसच्या उमेदवारांकडून अद्यापही सन्मान मिळाला नसल्याने किमान वारी तरी घडावी यासाठी कारभारी शोधत आहे.
या निवडणुकीत सर्वाधिक मतदार हे भाजपचे आहे. त्याखालोखाल काँग्रेसचे मतदार आहे. पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी २० ते २५ मतदार आहेत. काँग्रेसने उमेदवार देताना महाविकास आघाडीचा उमेदवार असल्याची घोषणा केली होती. परंतु ना सेनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेतले, ना राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारणा केली.
भाजपच्या उमेदवाराने निवडणुकीचे प्लॅनिंग आखले. आपल्या पक्षाचे जे मतदार अवघड ठरू शकतात. त्यांना लगेच हेरून चांगल्या पॅकेजच्या वारीवर पाठविले. त्यानंतर गटागटाने पक्षाच्या मतदारांना त्यांच्यात्यांच्या आवडीच्या ठिकाणी पाठविण्यात आले. भाजपच्या उमदेवाराला निवडून येण्यासाठी अपेक्षित मतदाराची त्यांनी चांगलीच आवभगत केली आहे.
मात्र, काँग्रेसच्या उमेदवाराने अजूनही पक्षाच्या मतदाराचेच नियोजन केले नाही. काँग्रेसचे तालुका तालुक्यातील मतदार गठ्ठ्याने एकत्र राहत आहे. आपल्यालाही वारीची संधी मिळेल किंवा काही सूचना येतील याच्या प्रतिक्षेत सद्या घरातच बसून आहे. काँग्रेसच्याच सदस्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरल्यागत असल्याने राष्ट्रवादी व सेनेच्या मतदारांचा मान सन्मान दूरचाच आहे. दोन्ही पक्षाच्या मतदारांचे आपापल्या नेत्यांच्या सूचनांकडे लक्ष लागून आहे. काँग्रेसकडून वारी, सवारीची कुठलीही तडजोड दिसून येत नसल्याने कुठल्यातरी माध्यमातून आपलेही देवदर्शन व्हावे याच्या प्रतिक्षेत राष्ट्रवादी व सेनेचे मतदार आहेत.
याचाच फायदा भाजपच्या उमेदवाराने घेतला आहे. आपले मतदार वारीवर पाठवून आता भाजपचे उमेदवार काँग्रेससह शिवसेना व राष्ट्रवादीच्या मतदाराच्या संपर्कात आहे. त्यांच्या घरी चहासाठी येत असल्याचे सांगून घरी जावून भेटी घेत आहे. मोठ्या विनम्रतेने सद्या उमेदवाराकडून विनंती केली जात आहे. त्यामुळे सेना व राष्ट्रवादीच्या मतदारांमध्ये भाजपाच्या उमेदवाराबद्दल एक सहानुभूती निर्माण झाली आहे. ही सहानुभूती मतांच्या माध्यमातून निवडणुकीत दिसून आल्यास त्यांनाही कुठेतरी मानसन्मान मिळाला हेच दिसून येईल.