राजकारण्यांनी एकमेकांवर टीका करावी, मात्र देशाचे नाव खराब करू नये; संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2023 10:12 PM2023-06-01T22:12:08+5:302023-06-01T22:13:02+5:30

Nagpur News नेत्यांनी एकमेकांवर टीकाटिप्पणी करायला हवी. मात्र त्यातून लोकांमध्ये विसंवाद उपस्थित होऊ नये व देशाचे नाव खराब होऊ नये एवढा विवेक तरी बाळगायला हवा, या शब्दांत सरसंघचालकांनी आपले मत व्यक्त केले.

Politicians should criticize each other, but not tarnish the name of the country; Concluding the team's third year training class | राजकारण्यांनी एकमेकांवर टीका करावी, मात्र देशाचे नाव खराब करू नये; संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाचा समारोप

राजकारण्यांनी एकमेकांवर टीका करावी, मात्र देशाचे नाव खराब करू नये; संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाचा समारोप

googlenewsNext


नागपूर : राजकारणाचा स्तर घसरत असल्याची चर्चा समाजात होत असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनीदेखील राजकारण्यांच्या बोलबच्चनगिरीवर परखड भाष्य केले आहे. राजकारणात विविध पक्षांमध्ये सत्तेसाठी स्पर्धा असतेच. मात्र त्याचीदेखील मर्यादा असते याचे भान ठेवायला हवी. नेत्यांनी एकमेकांवर टीकाटिप्पणी करायला हवी. मात्र त्यातून लोकांमध्ये विसंवाद उपस्थित होऊ नये व देशाचे नाव खराब होऊ नये एवढा विवेक तरी बाळगायला हवा. मात्र तो विवेक काही राजकारण बाळगत नसल्याचे चित्र आहे. यामुळे जनतेमध्ये चुकीचे चित्र जात आहे, या शब्दांत सरसंघचालकांनी आपले मत व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.


रेशीमबाग मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला कोल्हापूर येथील कणेरीतील श्री सिद्धगिरी संस्थान मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आपल्या देशात विविधता असूनदेखील एकता कायम राहिली आहे. मात्र देशातील अनेक ठिकाणी अंतर्गत वाददेखील आहेत. भाषा, पंथ-संप्रदाय, सवलतींवरून वाद होत असून लोक पापसातच हिंसा करत आहेत. आपण शत्रूंना आपले बळ न दाखवता आपापसात लढत आहोत. आपण एक देश आहोत याचा विसर पडतो आहे. याला प्रोत्साहन देणारे अनेक लोक आहे व समाजात विद्वेष उत्पन्न करण्याची संधी ते शोधतच असतात. देशाची अखंडता कायम ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. दोषारोपण करून काहीच साध्य होणार नाही याचे भान राजकारण्यांनी बाळगायला हवे, असे सरसंघचालक म्हणाले. यावेळी प्रांत संघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया हेदेखील उपस्थित होते. यावेळी संघ स्वयंसेवकांनी विविध शारीरिक कवायती, योग, नियुद्ध यांचे सादरीकरण केले.

-भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- कोरोना, आर्थिक संकटात भारताने चांगली कामगिरी केली.
- आपल्या देशाला वास्तवात प्रगतीसोबत ज्या जागृतीची आवश्यकता होती, त्या जागृतीला आणण्याचा प्रयत्न होत आहे,
- आपल्या देशात जातीपातींवरून अन्याय झाला आहे. त्यांचे कर्ज आपल्याला चुकवावेच लागेल.
- लहान लहान कारणांवरून एकमेकांशी संघर्ष करणे अयोग्य. सर्वांनी संयम बाळगला पाहिजे.
- शॉर्टकटने दुःख विसरण्याचा प्रयत्न केल्या जातो व त्यातूनच ड्रग्ज, मद्याचे व्यसन लागते.
- पर्यावरणाप्रति अपूर्ण दृष्टीकोन घेऊन भारतच नव्हे तर जगातील लोकांनी मार्गक्रमण केले. याचा फटका बसतो आहे.
- जग भारताकडून नव्या दिशेची अपेक्षा ठेवत आहे. विवाद नव्हे तर संवादावर भर द्यावा लागेल.

-वैभवशाली संस्कृतीचे विस्मरण ही मोठी समस्या
देशाच्या सांस्कृतिक परंपरेचे जगातील इतर देशांतील लोकांनी आचरण केले. मात्र आपल्या लोकांनाच याचा काहीसा विसर पडत गेला. लोकसंख्या ही देशाची समस्या नाही. तर आपली परंपरा व वैभवशाली संस्कृतीचे विस्मरण ही मोठी समस्या आहे. विस्मरणात चाललेल्या आपल्या परंपरेची आठवण समाजाला करून देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी केले. आपल्या देशाला ध्वस्त करण्यासाठी विविध लोक तरुणांना व्यसनी बनवत आहेत. यात विदेशी तत्वांचादेखील समावेश आहे. त्यांना संघाच्या संस्कारांच्या माध्यमातूनच थांबविल्या जाऊ शकते, असेदेखील ते म्हणाले.

Web Title: Politicians should criticize each other, but not tarnish the name of the country; Concluding the team's third year training class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.