देशात ‘ब्लॅकमेलिंग’चे राजकारण : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:16 AM2018-01-31T00:16:34+5:302018-01-31T00:19:19+5:30

आपल्या देशातील राजकीय व्यवस्था कमकुवत होत असल्याचे चित्र आहे. विविध पक्षांची अनेक नेतेमंडळी तर राजकीयदृष्ट्या चक्क ‘आॅपरेशन’च्या टेबलवर असून, त्याची सूत्रे पंतप्रधानांच्या हाती आहेत. देशात ‘ब्लॅकमेलिंग’चे राजकारण फोफावले असून यात सर्वच राजकीय पक्षांचे नेते लुळे, लंगडे व बहिरे झाले आहेत, असे मत भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

Politics of 'Blackmail' in the country: Prakash Ambedkar | देशात ‘ब्लॅकमेलिंग’चे राजकारण : प्रकाश आंबेडकर

देशात ‘ब्लॅकमेलिंग’चे राजकारण : प्रकाश आंबेडकर

Next
ठळक मुद्दे‘दक्षिणायन’च्या ‘समास-२०१८’ अंतर्गत जाहीर सभेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपल्या देशातील राजकीय व्यवस्था कमकुवत होत असल्याचे चित्र आहे. विविध पक्षांची अनेक नेतेमंडळी तर राजकीयदृष्ट्या चक्क ‘आॅपरेशन’च्या टेबलवर असून, त्याची सूत्रे पंतप्रधानांच्या हाती आहेत. देशात ‘ब्लॅकमेलिंग’चे राजकारण फोफावले असून यात सर्वच राजकीय पक्षांचे नेते लुळे, लंगडे व बहिरे झाले आहेत, असे मत भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. ‘दक्षिणायन’च्या ‘समास-२०१८’ या अभियानांतर्गत मंगळवारी आयोजित जाहीर सभेदरम्यान ते बोलत होते.
काँग्रेसनगर येथील धनवटे महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामवंत साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे हे होते. शिवाय महात्मा गांधी यांचे नातू व इतिहासतज्ज्ञ राजमोहन गांधी, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, विलास मुत्तेमवार, भालचंद्र कानगो, धनाजी गुरव, के.के.चक्रवर्ती, दामोदर मौझो, प्रज्ञा दया पवार, डॉ.बबन तायवाडे, डॉ.प्रमोद मुनघाटे, अरुणा सबाने हे प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यघटनेनुसार सर्वांना धर्म पाळण्याचा अधिकार आहे. मात्र राज्यघटनेनुसार आपल्या देशाचा कुठलाही धर्म नाही. काही संघटनांनी संविधानाला विरोध केला होता व त्यांचा आताही विरोध आहे. त्यांच्याशी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. राजकीय लढाई लढून काहीही उपयोग होणार नाही. यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. आतापर्यंत देशात मुस्लीम, ख्रिश्चन, दलित, आदिवासी, ओबीसी ‘टार्गेट’ होते. परंतु ‘करणी सेने’च्या निमित्ताने हे भांडण आता सवर्णांच्या दारात पोहोचले आहे. परंतु आता देशात मूलभूत लढाईची सुरुवात झाली आहे व सर्वांनी यात सहभागी व्हायला हवे, असे प्रतिपादन अ‍ॅड.आंबेडकर यांनी केले. डॉ.गणेश देवी यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.
कट्टरतावादाला आंबेडकरवाद्यांनी थारा देऊ नये
देशात आजच्या तारखेत अघोषित आणीबाणी असून, घोषित एकाधिकारशाहीचे चित्र दिसून येत आहे. दडपशाहीचे वातावरण असून सामान्य जनतेच्या मनात रोष आहे. पद्म पुरस्कारांची निवड करताना सरकार सर्वसमावेशक असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न झाला. परंतु ती धूळफेकच आहे. कट्टरतावाद वाढविण्यावर सरकारचा भर आहे. अशा कट्टरतावादाला आंबेडकरवाद्यांनी थारा देऊ नये.
-प्रज्ञा दया पवार, प्राध्यापिका

जनतेमध्ये उन्माद निर्माण करण्याचा प्रयत्न
देशात नेमका कुठला व कशा पद्धतीने संघर्ष सुरू आहे, हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. सत्ताधाऱ्यांकडून जनतेचा उपयोग करण्यात येत आहे. जनतेमध्ये उन्माद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्यांना राष्ट्रद्रोही म्हणण्यात येत आहे. मूठभर लोकांच्या हाती विकासाची सूत्रे सोपविण्यात येत आहे. जनतेनेच पुढाकार घेण्याची वेळ आली आहे.
-भालचंद्र कानगो, राज्य सरचिटणीस, भाकप

ही जागे होण्याची वेळ
गेल्या तीन वर्षांपासून देशात वेगळेच वातावरण असून गुलामगिरीचा नवा चक्रव्यूह निर्माण झाला आहे. आताचे असोत किंवा अगोदरचे सत्ताधारी, सर्वच लोक पुरोगामी प्रवाहांसोबत शत्रूसारखेच वागत आले आहेत. जनतेच्या विश्वासाला तडा देत केवळ आपल्या पोळ्या शेकण्याचे काम केले. मात्र आता जनतेने जागे होण्याची वेळ आली आहे.
-धनाजी गुरव,

मौन तोडले पाहिजे
जातीपातीमध्ये भेदभाव करणे हे संविधानाच्या मूळ तत्त्वांच्या विरोधातच आहे. असे प्रयत्न करणारे लोक हे संविधानविरोधीच आहे. संविधानाचे संरक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. संविधानाचे उल्लंघन करणाऱ्यांना न्यायालयात खेचायला हवे. आता मौन तोडले पाहिजे.
-के.के.चक्रवर्ती

संविधानाचे रक्षण झाले पाहिजे
देशात सत्ताबदल झाल्यापासून जनसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. देशाच्या अस्तित्वाचा आधार असलेल्या संविधानासोबत छेडछाड करण्याची भाषा केंद्रातील मंत्री करतात. त्यामुळे पुढील धोक्यांची सूचना मिळते आहे. संविधानाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेतला पाहिजे.
-दामोदर मौझो

Web Title: Politics of 'Blackmail' in the country: Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.