विदर्भाच्या नावावर राजकारण धोकादायक : अविनाश पांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 12:03 AM2018-05-01T00:03:36+5:302018-05-01T00:03:47+5:30

वेगळ्या विदर्भाच्या नावावर राजकारणाला सुरुवात झाली आहे. परंतु याला राजकीय रूप मिळणे हे धोकादायक आहे. मात्र केवळ नारे देऊन विदर्भाचे भले होणार नाही. वेगळ्या विदर्भाला सक्षम करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत व त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची प्रचंड आवश्यकता आहे, असे मत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व माजी खासदार अविनाश पांडे यांनी व्यक्त केले.

Politics is dangerous for Vidarbha: Avinash Pandey | विदर्भाच्या नावावर राजकारण धोकादायक : अविनाश पांडे

विदर्भाच्या नावावर राजकारण धोकादायक : अविनाश पांडे

Next
ठळक मुद्देसुजाता आनंदन् यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : वेगळ्या विदर्भाच्या नावावर राजकारणाला सुरुवात झाली आहे. परंतु याला राजकीय रूप मिळणे हे धोकादायक आहे. मात्र केवळ नारे देऊन विदर्भाचे भले होणार नाही. वेगळ्या विदर्भाला सक्षम करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत व त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची प्रचंड आवश्यकता आहे, असे मत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व माजी खासदार अविनाश पांडे यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार सुजाता आनंदन् लिखित ‘महाराष्ट्र मॅक्सिमस : द स्टेट, इट्स सोसायटी अ‍ॅन्ड पॉलिटिक्स’ या पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते.
नागपूर प्रेस क्लबला झालेल्या या कार्यक्रमाला शिवसेना खा.आनंद अडसूळ, राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे, आ. आशिष देशमुख, ‘वनराई’चे विश्वस्त गिरीश गांधी, साहित्यिक वि.स.जोग, माजी पोलीस आयुक्त प्रबीरकुमार चक्रवर्ती, श्रीनिवास खांदेवाले हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. आतापर्यंत सरकार कुठल्याही पक्षाचे असो, विदर्भाला हवा तो न्याय मिळाला नाही. इच्छाशक्तीचीदेखील कमतरता होती. मात्र याचा अर्थ विदर्भाचा विकास न होताच त्याला वेगळे करणे असा होत नाही. जर अविकसित राज्य निर्माण झाले तर पुढील पिढ्यांना आणखी त्रास सहन करावा लागेल. विशेष म्हणजे जनतेचे खरोखर याला समर्थन आहे का हादेखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे, असे अविनाश पांडे म्हणाले. विदर्भावर सातत्याने अन्यायच झाला. या मुद्यावर चर्चेची आवश्यकता आहे. मात्र विदर्भ राज्याच्या निर्मितीला विरोध करणारे चर्चेपासून दूर पळतात. विदर्भ राज्य निर्माण झाले तर हा भाग सक्षम होईल, असे श्रीनिवास खांदेवाले म्हणाले. यावेळी लेखिका सुजाता आनंदन् यांनी पुस्तकातील मुद्यांवर भाष्य केले. नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र यांनी प्रास्ताविक केले. सरिता कौशिक यांनी संचालन केले.
विदर्भातील आमदारांनी दिल्लीला विचारावे
वेगळ्या विदर्भासंदर्भात प्रत्येकाच्या भावनांचा आदर केला पाहिजे. सत्तेत येण्यापूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांसह सर्वांनीच दिले होते. मात्र त्या आश्वासनाबाबत सद्यस्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी भाजपच्या सर्व आमदारांनी दिल्लीत चलावे व तेथे वरिष्ठ नेत्यांना विचारणा करावी, असे प्रतिपादन आ. आशिष देशमुख यांनी व्यक्त केले.

Web Title: Politics is dangerous for Vidarbha: Avinash Pandey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.