गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या नावावरून राजकारण तापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:08 AM2021-01-21T04:08:16+5:302021-01-21T04:08:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गोरेवाडा येथील आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोरेवाडा येथील आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. या निर्णयाला विविध संघटनांनी विरोध दर्शविला आहे. बुधवारी या संदर्भात विदर्भवाद्यांनी आंदोलन करीत या निर्णयाची (जी.आर.) होळी केली. तसेच विविध आदिवासी संघटनाांनी निवेदनाद्वारे आपला विरोध दर्शविला.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने बुधवारी दुपारी गिरीपेठ येथील समितीच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी निर्णयाच्या आदेशाची होळी करण्यात आली. तसेच येत्या २६ जानेवारी रोजी उद्घाटनाच्या दिवशी काळे झेंडे दाखविण्यात येतील, असा इशाराही दिला.
बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच स्वतंत्र विदर्भ राज्याच्या विराेधात राहिले. त्यामुळे ते विदर्भविरोधी असून त्यांचे नाव गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाला नको. त्याऐवजी विदर्भातील कोणत्याही नेत्याचे नाव चालेल, अशी भूमिका यावेळी समितीच्या वतीने मांडण्यात आली. आंदोलनात समितीचे मुख्य संयोजक राम नेवले, मुकेश मासूरकर, अरुण केदार, रेखा निमजे, गुलाबराव धंडे, नितीन अवस्थी, राजेंद्र सतई यांच्यासह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
बॉक्स
गोंडवाना राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय नाव द्या
गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला ट्रायबल ऑफिसर्स फोरमसह आदिवासी संघटनांनीही विरोध दर्शविला असून, या प्राणिसंग्रहालयाला ‘गोंडवाना राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. या संदर्भात माजी महापौर माया इवनाते यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन सादर केले. शिष्टमंडळात ट्रायबल ऑफिसर्स फोरमचे अध्यक्ष एम. एम. आत्राम, एन. झेड. कुमरे, वसंत सयाम, आर. बी. पेंदाम, विलास कुमरे, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाॅइज फेडरेशनचे केंद्रीय अध्यक्ष मधुकर ऊईके, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिनेश शेराम, श्याम कार्लेकर, राजेंद्र मरसकोल्हे, आदींचा समावेश हाेता.