ओरकांडीत मोदींच्या 'हरी बोल' घोषणेमागे मतुआ मतांचे राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:07 AM2021-03-28T04:07:28+5:302021-03-28T04:07:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोलकता : बांगलादेशात गोपालगंजजवळच्या ओरकांडी येथे हरिचंद व गुरुचंद ठाकूर यांच्या मंदिराला भेट व हरी बोल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोलकता : बांगलादेशात गोपालगंजजवळच्या ओरकांडी येथे हरिचंद व गुरुचंद ठाकूर यांच्या मंदिराला भेट व हरी बोल शब्दांनी तिथल्या भाषणाची सुरुवात या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शनिवारच्या कृतीकडे पश्चिम बंगालमधील मतुआ समाजाची मते मिळविण्याचे डावपेच म्हणून पाहिले जात आहे.
याच कारणाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदींचा हा प्रचार म्हणजे आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप केला असून याविषयी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.
भारत-बांगलादेश सीमेवरील ठाकूरबाडी हे मतुआ समाजाचे भारतातील तीर्थक्षेत्र, तर बांगलादेशात ओरकांडीचे तेच पावित्र्य आहे. हिंदू दलित म्हणविला जाणारा मतुआ समाज बंगालच्या सामाजिक रचनेत चांडाळ वर्गात गणला जायचा. त्यातून बाहेर पडण्यासाठी हरिचंद व गुरुचंद ठाकूर या पितापुत्रांनी धार्मिक व सामाजिक क्रांती केली. त्यामुळेच या समाजाचे लोक एकमेकांना हरी बोल, असे अभिवादन करतात. पंतप्रधान मोदींनी ओरकांडी मंदिराला भेटीनंतरच्या भाषणाची सुरवात हरी बोल अशीच केली.
बंगालमधील पॉलिटिकल फोर्स
गेली जवळपास दोनशे वर्षे ठाकूर घराण्याचा बंगालच्या राजकारणावर मोठा प्रभाव आहे. राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रभावी व जागरूक समाजांपैकी एक असलेल्या मतुआ समाजानेच सत्तरच्या दशकात काँग्रेसची सत्ता उलथवून टाकली, तर डाव्यांची प्रदीर्घ सत्तासमाप्ती व ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलच्या उदयातही या समाजाचा मोठा वाटा होता. दीड-पावणेदोन कोटी लोकसंख्येच्या मतुआंचा लोकसभेचे सात मतदारसंघ व विधानसभेच्या पन्नास ते साठ जागांवर प्रभाव आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मतुआ महासंघाच्या प्रमुख बडी मां वीणापाणी देवी ठाकूर यांचे १०१ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या स्नुषा व बनगावच्या तृणमूल खासदार ममता बाला ठाकूर यांच्याकडे परिवाराचे प्रमुखपद आले. लोकसभा निवडणुकीत ममता बाला यांचा भाजपच्या तिकिटावर पुतणे शांतनू ठाकूर यांनी पराभव केला. तेव्हापासून मतुआ मते विधानसभा निवडणुकीतही आपल्याला मिळतील, असा भाजपला विश्वास वाटतो. ओरकांडी येथे बोलताना पंतप्रधानांनी खासदार शांतनू ठाकूर यांचे जाहीर कौतुक केले असले तरी मध्यंतरी ते नाराज होते व ती नाराजी दूर करण्यासाठी त्यांचे बंधू सुब्रत यांना भाजपने गाईघाटा मतदारसंघात उमेदवारी दिली.
--------------------