मालमत्ता करमाफीवरून मनपात 'पॉलिटिक्स'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2022 02:01 PM2022-01-05T14:01:51+5:302022-01-05T14:04:36+5:30
मनपा निवडणूक विचारात घेता नागरिकांना आकर्षित करणाऱ्या घोषणा करण्याची चढाओढ सुरू आहे.
नागपूर : मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर नागपूर शहरातील ५०० चौरस फुटापर्यंतच्या मालमत्तांवरील कर माफ करण्यात यावा, असा ठराव मंगळवारी मनपाच्या कर आकारणी व कर संकलन समितीच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला, तर विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी ६०० चौरस फुटापर्यंतच्या रहिवासी मालमत्तांचा कर माफ करण्याची मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.
मनपा निवडणूक विचारात घेता नागरिकांना आकर्षित करणाऱ्या घोषणा करण्याची चढाओढ सुरू आहे. वास्तविक मनपाची आर्थिक स्थिती विचारात घेता नागपुरात करमाफीचा निर्णय शक्य नाही, तरीही ठराव मंजूर करण्यात आला. बैठकीला कर आकारणी व कर संकलन समितीचे सभापती महेंद्र धनविजय, उपसभापती सुनील अग्रवाल, सदस्य अनिल गेंडरे, संजय बुरेर्वार, सदस्या विशाखा मोहोड, शीतल कामडे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य सरकारने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ५०० चौरस फुटापर्यंतच्या रहिवासी मालमत्तांचा मालमत्ता कर माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. राज्य सरकारचा हा निर्णय गोरगरिबांच्या हिताचा आहे. या निर्णयाची शहरातही अंमलबजावणी व्हावी, या दृष्टीने बैठकीत चर्चा करून ५०० चौरस फूट मालमत्तांचा कर माफ व्हावा, असा ठराव पारित केला. वास्तविक अशा स्वरूपाचा निर्णय घेण्याचा अधिकार समितीला नाही. सभागृहाच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवावा लागेल. सरकारने मंजुरी दिली तरच करमाफी मिळेल. मात्र आर्थिक भार मनपाला उचलावा लागेल.