पाणी टंचाईवरून सत्ताधाऱ्यांमध्ये कुरघोडीचे राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 12:55 AM2019-03-19T00:55:14+5:302019-03-19T00:56:03+5:30
जिल्ह्यात लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, जि.प. स्तरावर युतीमध्येच कुरघोडीचे राजकारण रंगत आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यास जि.प. अध्यक्षांसह सर्वच पदाधिकारी सपशेल अपयशी ठरल्यामुळे संपूर्ण जिल्हा परिषद बरखास्त करावी, अशी आरोपवजा मागणी शिवसेनेच्या जि.प. सदस्य भारती गोडबोले यांनी केली आहे. गोडबोलेच्या जाहीर वक्तव्यावरून संतापलेल्या जि.प.च्या अध्यक्ष निशा सावरकर यांनी गोडबोले काँग्रेसची सुपारी घेतल्यासारखेच वागत असल्याचा आरोप केला आहे. सोमवारी निशा सावरकर व जि.प. सदस्य जयकुमार वर्मा यांनी पत्रपरिषदेतून गोडबोलेंना चांगलीच फटकार लावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, जि.प. स्तरावर युतीमध्येच कुरघोडीचे राजकारण रंगत आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यास जि.प. अध्यक्षांसह सर्वच पदाधिकारी सपशेल अपयशी ठरल्यामुळे संपूर्ण जिल्हा परिषद बरखास्त करावी, अशी आरोपवजा मागणी शिवसेनेच्या जि.प. सदस्य भारती गोडबोले यांनी केली आहे. गोडबोलेच्या जाहीर वक्तव्यावरून संतापलेल्या जि.प.च्या अध्यक्ष निशा सावरकर यांनी गोडबोले काँग्रेसची सुपारी घेतल्यासारखेच वागत असल्याचा आरोप केला आहे. सोमवारी निशा सावरकर व जि.प. सदस्य जयकुमार वर्मा यांनी पत्रपरिषदेतून गोडबोलेंना चांगलीच फटकार लावली.
जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ८१२ बोअरवेल मंजूर केल्या आहेत. परंतु, एकाही बोअरवेलचे काम सुरू झालेले नाही. पदाधिकाऱ्यांकडून निविदेच्या माध्यमातून कामे घेणाऱ्या कंत्राटदाराला कमिशनची मागणी केली जाते, असा अप्रत्यक्ष पण थेट आरोप शिवसेनेच्या जि. प. सदस्य भारती गोडबोले यांनी जि.प. अध्यक्ष निशा सावरकर यांच्यावर केला. जि.प. मध्ये भाजप व शिवसेनेची सत्ता आहे. हा आरोप विरोधकांनी न करता खुद्द सत्तापक्षातील शिवसेनेच्या गोडबोले यांनी करून ‘घरचा अहेर’ दिल्यामुळे हा आरोप जि.प. अध्यक्ष सावरकर यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. गोडबोलेंवर पलटवार करीत निशा सावरकर म्हणाल्या की, भाजप-शिवसेनेची युती झाली आहे. पक्षनेतृत्वाच्या सूचनेप्रमाणे आम्ही एकदिलाने काम करीत आहोत. मात्र, गोडबोलेंकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्या नेहमीच मला टार्गेट करून स्वत:ला चर्चेत ठेवतात. देवेंद्र व भारती गोडबोले या दाम्पत्याने काँग्रेसची सुपारी घेऊन आमची (भाजप) बदनामी सुरू केली आहे. खरेतर, जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून सत्तापक्ष व प्रशासन पाणीटंचाई निर्मूलनार्थ झपाट्याने काम करीत आहोत. कंत्राटदाराकडून पैसे मागितले हा गोडबोले यांचा आरोप बिनबुडाचा असून, त्यांनी आरोप सिद्ध करून दाखवावाच, असे आव्हान सावरकर यांनी दिले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैरभाव विसरून भाजप-शिवसेनेची युती झाली. कार्यकर्त्यांनीही नाही-नाही म्हणता-म्हणता एकमेकांशी जुळवून घेतले. पण मौदा तालुक्यात शिवसेनेच्या गोडबोले व भाजपच्या सावरकर यांच्यामध्ये अजूनही सूत जुळले नाही. या वादाचा फटका उमेदवाराला बसेल काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.