आठ लाखांची लाच मागणारा नागपूर पोलीस आयुक्तालयातील पोलके गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:01 AM2017-12-30T00:01:13+5:302017-12-30T00:04:04+5:30
बार संचालकाला आठ लाख रुपयांची लाच मागणारा पोलीस आयुक्तालयातील कर्मचारी संजय पोलके याला अखेर सदर पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : बार संचालकाला आठ लाख रुपयांची लाच मागणारा पोलीस आयुक्तालयातील कर्मचारी संजय पोलके याला अखेर सदर पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. त्याच्या अटकेमुळे पोलीस दलातील खाबूगिरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. हिंगणाजवळच्या मोंढा येथील बार संचालक नीलेश सिंग यांनी बार स्थलांतरणाची परवानगी देण्यासाठी आयुक्तालयात अर्ज दिला होता. अनेक दिवस झुलविल्यानंतर आयुक्तालयातील कर्मचारी संजय पोलके याने सिंग यांना आठ लाख रुपयांची लाच दिल्यास काम करून देऊ, असे म्हटले. आपण आठ लाख रुपये देऊ शकत नाही, असे म्हटल्यानंतर पोलकेने पाच लाख आणि नंतर तीन लाखात सौदा पक्का केला. मंगळवारी दुपारी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्याकडे हे प्रकरण आले. सिंग यांनी पोलकेला पुन्हा फोन केला तेव्हा तातडीने एक लाख रुपये पाठविण्यास सांगितले. या प्रकाराची डॉ. के. व्यंकटेशम यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी एसीपी अश्विनी पाटील यांना तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले. पाटील यांनी बुधवारी आणि गुरुवारी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर त्याचा शुक्रवारी अहवाल दिला. त्यात पोलके लाच मागत असल्याचे स्पष्ट झाल्याने आज शुक्रवारी त्याला रात्री ८ वाजता सदरचे ठाणेदार सुनील बोंडे यांनी अटक केली.