नरखेड तालुक्यात १७ ग्रामपंचायतींंसाठी मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:13 AM2021-01-16T04:13:16+5:302021-01-16T04:13:16+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क नरखेड : तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींमधील एकूण १४७ जागांपैकी १४ सदस्यांची अविराेध निवड करण्यात आल्याने उर्वरित १३३ ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींमधील एकूण १४७ जागांपैकी १४ सदस्यांची अविराेध निवड करण्यात आल्याने उर्वरित १३३ जागांसाठी शुक्रवारी (दि. १५) घेण्यात आलेली मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. या १७ गावांमधील एकूण २६,४९८ मतदारांपैकी ४७.८९ टक्के मतदारांनी सकाळी ७.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत तर ६८.८५ टक्के मतदारांनी दुपारी ३.३० वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला हाेता. त्यामुळे निवडणूक रिंगणातील सर्व उमेदवारांचे राजकीय भवितव्य सायंकाळी मशीनबंद करण्यात आले.
नरखेड तालुक्यात अंबाडा (सायवाडा), दातेवाडी, देवळी, जलालखेडा, जामगाव (बुजुर्क), खैरगाव, खरबडी, मदना, महेंद्री, माणिकवाडा, पेठ मुक्तापूर, सायवाडा (अंबाडा), सिंजर, थडीपवनी, देवग्राम (थुगावदेव), उमठा व येरला (इंदाेरा) या १७ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. या १७ गावांमध्ये एकूण २६,४९८ मतदार असून, यात १३,९१२ पुरुष व १२,५८६ महिला मतदारांचा समावेश आहे. येथील ५५ प्रभागांमधील १४७ सदस्य निवडायचे हाेते. यातील एका प्रभागासह १४ सदस्यांची अविराेध निवड करण्यात आल्याने मतदारांनी ५४ प्रभागांमधील १३३ जागांसाठी मतदान केले.
सकाळी ८ वाजतापासून शेतात काम करायला जाणाऱ्यांनी तर दुपारी १ वाजतापासून गृहिणीनीही मतदार केंद्रावर मतदान करण्यासाठी गर्दी केली हाेती. दुपारी ३ वाजतानंतर केंद्रांवरील मतदारांचे प्रमाण कमी हाेत गेले. परंतु, शेवटच्या अर्धा तासात मतदारांची लगबग व ओघ वाढला हाेता. तालुक्यातील खैरगाव, जलालखेडा, थडीपवनी या माेठ्या व संवेदनशील समजल्या जाणाऱ्या गावांमध्ये शांततेत मतदान झाले. मतदान केंद्रांवर आशासेविका व मदतनिसांची नियुक्ती करण्यात आली हाेती. त्यांनी प्रत्येक मतदारांच्या शरीराचे तापमान, ऑक्सिजन लेव्हल माेजून व त्यांचे हात सॅनिटाईझ करून आत प्रवेश दिला.
...
मतदार आणण्यावरून वाद
मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यावरून मदना व बाेपापूर येथील मतदान केंद्रांवर दाेन गट व पाेलिसांमध्ये शाब्दिक वाद उद्भवला हाेता. मात्र, वाद वेळीच शमल्याने दाेन्ही ठिकाणी काेणताही अनुचित प्रकार घडला नाही. प्रत्येक मतदान केंद्रावर चाेख पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता. मतदान केंद्रांपासून १०० मीटर पर्यंतच्या परिसरात वाहन अथवा मतदारांना आणण्यास मज्जाव केला हाेता.