प्रदूषण पसरविणारे उद्योग एमपीसीबीच्या रडारवर; सात उद्योगांची बँक गॅरंटी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2023 09:04 PM2023-04-20T21:04:14+5:302023-04-20T21:04:43+5:30
Nagpur News वायू व जल प्रदूषण पसरविणारे उद्योग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) रडारवर असून, नोटीस दिल्यानंतरही सुधारणा न झालेल्या हिंगणा व बुटीबोरी येथील सात उद्योगांची एकूण ३६.५ लाखांची बँक गॅरंटी मंडळाने जप्त केली आहे.
नागपूर : वायू व जल प्रदूषण पसरविणारे उद्योग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) रडारवर असून, नोटीस दिल्यानंतरही सुधारणा न झालेल्या हिंगणा व बुटीबोरी येथील सात उद्योगांची एकूण ३६.५ लाखांची बँक गॅरंटी मंडळाने जप्त केली आहे. त्यानंतरही उद्योगाच्या संचालनात सुधारणा न झाल्यास अधिकारी उद्योगांना थेट टाळे ठोकणार आहेत.
प्रदूषण मंडळाची कठोर भूमिका
शिल्पा स्टील ॲण्ड पॉवर (१० लाख बँक गॅरंटी जप्त), जयस्वाल निको लि. रूईखैरी, वर्धा रोड (२ लाख), सुपरिअर ड्रिक्स प्रा.लि. (५ लाख), इंडिगो डेनिम प्रा.लि. (१० लाख), इंडोरामा सिंथेटिक्स (२ लाख), ग्राइंडवेल नॉर्टन (५ लाख), बुटीबोरी एमआयडीसी, केईसी इंटरनॅशनल (२.५ लाख), बुटीबोरी एमआयडीसी अशी उद्योगांची नावे असून, त्यांच्याकडून एकूण ३६.५ लाख रुपयांची बँक गॅरंटी जप्त केली आहे. ही कारवाई वर्ष २०२१ ते डिसेंबर २०२२ या कालावधीसाठी करण्यात आली आहे. प्रदूषण पसरविणाऱ्यांविरुद्ध मंडळाने कठोर भूमिका घेतली आहे. प्रारंभी उद्योगाची तपासणी करून सुधारणा करण्याची नोटीस दिली जाते. त्यानंतरही अखेरची सूचना आणि नंतर बँक गॅरंटी जप्तीची कारवाई केली जाते. या प्रक्रियेनुसार या सात उद्योगांवर कारवाई करण्यात आली आहे. उद्योगातील रसायनयुक्त पाणी थेट नाल्यात सोडून जल प्रदूषण करणाऱ्यांना आधीच नोटीस दिल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे.
२१ उद्योगांना नोटिसा
मंडळाने हिंगणा आणि बुटीबोरी येथील २१ उद्योगांवर विविध कारणांनी ऑक्टोबर-२१ ते एप्रिल-२३ पर्यंत कारवाई केली आहे. यापैकी काहींना अंतरिम, तर काहींना कंपनी बंद करण्याची नोटीस दिली आहे. या उद्योगांमध्ये नारायण प्रोसिड फूड, हरिवंश पॅकेजिंग, इंडिगो डेनिम, नोव्हेटिव्ह टेक्सटाईल, लार्सन टार्बो, स्वराज इंडस्ट्रीज, ग्राइंडवेल नॉर्टन, शिवम नायट्रेट, युनिटेक पॉवर ट्रान्समिशन, ग्रिप टाइट श्रिंक फिल्मस, प्लास्टिक इंडस्ट्रीज, मालू इलेक्ट्रो, असित ग्लास, खेमका उद्योग, बालाजी एन्टरप्राईजेस, सीबी प्लास्ट, प्रिज्म जॉनसन, आदींचा समावेश आहे. तसेच प्लास्टिक अधिनियम २०१८ चे पालन न केल्यासंदर्भात अष्टविनायक प्लास्टिक इंडस्ट्रीला बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
उद्योगांनी करावे प्रदूषण मानकांचे पालन
उद्योगांना प्रदूषण मानकांचे पालन करणे आवश्यक आहे. न करणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल. वायू किंवा जल प्रदूषण पसविणाऱ्यांना आधी नोटीस देण्यात येते. नंतर पुन्हा नोटीस आणि सुधारणा न झाल्यास बँक गॅरंटी जप्त केली जाते.
आनंद काटोले, उपक्षेत्रीय अधिकारी, एमपीसीबी, नागपूर.