नागपूर शहराचे प्रदूषण अनेक वर्षांच्या नीचांकीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 07:43 PM2020-04-19T19:43:49+5:302020-04-19T19:45:36+5:30
नागपूर शहराच्या प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण असलेले धुलीकण (पर्टिकुलेट मॅटर-पीएम१०/२.५) मध्ये मोठी घट झाली आहे. याशिवाय सल्फर डायऑक्साईड (एसओटू), नायट्रोजन डायऑक्साईट (एनओटू) आणि कार्बनही निम्म्याने घटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना महामारी नियंत्रित करण्यासाठी लागलेल्या टाळेबंदीमुळे एकिकडे जनजीवन ठप्प पडले आहे पण दुसरीकडे याच टाळेबंदीमुळे प्रदूषण मात्र अनेक वर्षांच्या निचांकीवर आले आहे. कोट्यवधी खर्च करून जे शक्य झाले नसते ते टाळेबंदीने शक्य झाले. शहराच्या प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण असलेले धुलीकण (पर्टिकुलेट मॅटर-पीएम१०/२.५) मध्ये मोठी घट झाली आहे. याशिवाय सल्फर डायऑक्साईड (एसओटू), नायट्रोजन डायऑक्साईट (एनओटू) आणि कार्बनही निम्म्याने घटले आहे.
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) च्या वैज्ञानिकांनी लॉकडाउनपूर्वी आणि नंतर घेतलेल्या हवेतील नमुन्यांच्या अभ्यासातून प्रदूषणामध्ये झालेला हा बदल स्पष्ट होत असल्याचे सांगितले. सीएसआयआर-नीरीच्या वायु प्रदूषण नियंत्रण विभागाचे प्रमुख आणि मुख्य वैज्ञानिक डॉ. के.व्ही. जॉर्ज यांच्या मार्गदर्शनात नीरीचे प्रमुख संशोधक डॉ. नीलकमल यांच्या चमूने हा अभ्यास केला. या अभ्यासात लॉकडाउनपूर्वी सामान्य जनजीवन असताना २० फेब्रुवारी ते २० मार्च या काळातील व लॉकडाउननंतर २१ मार्च ते १७ एप्रिलपर्यंतचे हवेचे नमुने तपासण्यात आले. नागपूर शहरात सामान्य जनजीवन असताना सर्वाधिक प्रदूषण हे धुलीकणांचे असते. ते सरासरी ६० ते ७० मायक्रोग्रॅम/मीटर क्यूब पासून १२०म्युग्रॅ/मी. क्यूबची धोक्याच्या पातळीपर्यंत पोहचला आहे. मात्र लॉकडाउनमुळे ही पातळी ४० ते ४७ म्युग्रॅ/मी.क्यूब पर्यंत खाली आली आहे. पीएम-१० ६० ते ७० युनिटवरून ४७ वर आले आहे तर पीएम-२.५ चा स्तर २३ युनिटपर्यंत खाली आला आहे.
दुसरीकडे रस्त्यावर वाहनसंख्या कमालीची घटल्याने एनओटूचे प्रमाणही घटले आहे. एनओटू ४८ म्यूग्रॅ/मी.क्यूबवरून २५ म्यूग्रॅ/मी.क्यूब पर्यंत खाली घसरला आहे. परिसरात उर्जा प्रकल्पामुळेही शहरातील प्रदूषणात कायम वाढ आलेली आहे. दरम्यान फेब्रुवारी ते एप्रिलच्या काळात हवेचा प्रवाह जमिनीपासून २४० मीटरवरून उत्तर-पश्चिम आणि दक्षिण-पश्चिमच्या दिशेने असल्याने नागपूर शहर एसओटूच्या प्रदूषणापासूनही मुक्त राहिल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे एसओटूचे प्रमाण ९ म्यूग्रॅ/मी.क्यूबवरून २ म्यूग्रॅ/मी.क्यूवर घसरले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान सायंकाळच्या वेळी तापमान कमी होत असल्याने प्रदूषणाच्या वर जाण्याची प्रक्रिया खंडित होत असल्याने पीएम-२.५ मध्ये थोडी वाढ होत असल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.