वीज केंद्रातील प्रदूषणांवर कारवाई व्हावी; नितीन गडकरी यांचे महाजेनकोच्या प्रबंध निदेशकांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2022 08:15 AM2022-02-08T08:15:00+5:302022-02-08T08:15:02+5:30
Nagpur News कोराडी व खापरखेडा औष्णिक वीज केंद्राद्वारे होत असलेल्या प्रदूषणाच्या तक्रारींबाबत तातडीने कारवाई करावी, असे निर्देश केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत.
नागपूर : कोराडी व खापरखेडा औष्णिक वीज केंद्राद्वारे होत असलेल्या प्रदूषणाच्या तक्रारींबाबत तातडीने कारवाई करावी, असे निर्देश केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. यासंदर्भात त्यांनी महाजेनकोचे अध्यक्ष प्रबंध निदेशक संजय खंडारे यांना पत्र लिहिले असून, या पत्रासह सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (सीएसडी)च्या संस्थापिका लीना बुद्धे यांनी तयार केलेला अहवालही जोडला आहे.
या पत्रात सीएसडीद्वारे करण्यात आलेल्या अभ्यासपूर्ण अहवालानुसार महाजेनको राख व्यवस्थापनात पर्यावरण व अन्य मानकांचे पालन करीत नाही आहे. खापरखेडा वीज केंद्रातून निघणारी राख बिना नांदगाव ग्रामपंचायतीच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय तलावात सोडली जात आहे. सीएसडीचा असा निष्कर्ष आहे की, यामुळे ग्रामीण नागरिक व पर्यावरणावर दुष्परिणाम होतील.
गडकरी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, महाजेनकोने वीज केंद्रातून निघणाऱ्या राखेचा १०० टक्के वापर करण्यासाठी योजना तयार करायला हवी. नियमांचेही पालन करायला हवे. यासंदर्भात योग्य ती कारवाई करून त्याची माहिती त्यांच्या कार्यालयाला कळविण्यात यावी, असे निर्देशही दिले आहेत.
लीना बुद्ध यांनी गडकरी यांना माहिती दिली होती की, नांदगाव येथील गावकऱ्यांनी वीज कंपनीतील राख तलावात सोडणे बंद करण्याची मागणी केली आहे. भविष्यात याचे दुष्परिणाम होतील, अशी त्यांना भीती आहे. वारेगाव-खैरी, खसाळा व मसाळा गावाप्रमाणेच नांदगाव येथेही राख ठेवण्यात येऊ नये, अशी त्यांची मागणी आहे.