‘पॉलि’चे टेक्निक जुळेना !
By admin | Published: July 5, 2016 02:35 AM2016-07-05T02:35:35+5:302016-07-05T02:35:35+5:30
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ‘पॉलिटेक्निक’ प्रवेशाची स्थिती फारच खराब झाली आहे. प्रवेशप्रक्रियेत विभागातील
१५ हजारांवर जागा रिक्त राहणार : ३७ टक्केच अर्ज दाखल
नागपूर : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ‘पॉलिटेक्निक’ प्रवेशाची स्थिती फारच खराब झाली आहे. प्रवेशप्रक्रियेत विभागातील जागांसाठी केवळ ३७ टक्के अर्ज आले असून १५ हजारांवर जागा रिक्त राहण्याचा धोका आहे. विशेष म्हणजे प्रवेश अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली होती. मात्र तरीदेखील विद्यार्थ्यांचा निरुत्साह कायमच राहिला. दरम्यान फारच कमी प्रमाणात अर्ज आल्याने जागा कशा भराव्यात, असा यक्षप्रश्न महाविद्यालय प्रशासनांसमोर उभा राहिला आहे.
‘पॉलिटेक्निक’च्या प्रवेशप्रक्रियेला १८ जून रोजी प्रारंभ झाला. परंतु सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांचा फारसा प्रतिसाद दिसून आला नाही. प्रवेशप्रक्रियेच्या आधीच्या वेळापत्रकानुसार अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३० जून ही होती. मात्र विद्यार्थ्यांचा अतिशय कमी प्रमाणात मिळालेला प्रतिसाद पाहता प्रवेश अर्ज दाखल करण्याची मुदत चार दिवसांनी वाढवण्यात आली होती. नागपूर विभागातील सर्व ६९ ‘पॉलिटेक्निक’ महाविद्यालये मिळून एकूण २५,२८५ जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी आतापर्यंत अखेरच्या दिवसापर्यंत केवळ ९,३०० अर्ज आले आहेत व याची टक्केवारी काढली असता ती अवघी ३७ टक्के आहे. त्यामुळे यंदा विभागात १५ हजारांहून अधिक जागा रिक्त राहण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.सोमवारी अखेरच्या दिवशी शेवटच्या दोन तासांत २०० विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले. (प्रतिनिधी)
महाविद्यालयांसमोर प्रवेशाचे संकट
४पॉलिटेक्निकच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाकडून प्रवेशाची मर्यादा ३५ टक्क्यांवर घसरवण्यात आली होती. मात्र तरीदेखील विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यास विभागाला अपयश आलेले आहे. पॉलिटेक्निकच्या अभ्यासक्रमाचे भरमसाठ शुल्क भरूनदेखील विद्यार्थ्यांना हवी तशी नोकरी मिळत नाही. अनेकांना तर कॅम्पस मुलाखतींदरम्यान १० हजारांच्या आतीलच नोकरी देण्यात आली होती. यामुळेच ३५ टक्क्यांची आॅफरदेखील फ्लॉप झाल्याचे दिसून येत आहे. मात्र आता रिकाम्या जागा भरायच्या कशा असा प्रश्न महाविद्यालयांसमोर उभा झाला आहे.