पाॅलिटेक्निकच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला १८ जुलैपर्यंत मुदतवाढ
By निशांत वानखेडे | Published: July 10, 2024 07:09 PM2024-07-10T19:09:41+5:302024-07-10T19:10:14+5:30
Nagpur : २५ जुलैला लागेल अंतिम यादी
नागपूर : महाराष्ट्र राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने पाॅलिटेक्निक व वास्तुशास्त्र पदविका अभ्यासक्रम प्रवेशाच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ दिली आहे. सुरुवातीला ९ जुलै ही ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख हाेती, पण आता विद्यार्थ्यांना १८ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे.
कमी खर्चाच्या इंजिनीअरिंग पदविका अभ्यासक्रमात झटपट नाेकरी किंवा व्यवसायाची संधी मिळत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये पाॅलिटेक्निकची क्रेझ आहे. यात आता कृत्रिम बुद्धिमत्ता, डाटा सायन्ससारखे अभ्यासक्रमही जाेडले असल्याने विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. नागपूर विभागात विविध पाॅलिटेक्निक अभ्यासक्रमांचे शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित, खाजगी विनाअनुदानित असे ५० महाविद्यालये असून त्यात १२,६०० जागा आहेत. ९ जुलैच्या अंतिम मुदतीपर्यंत तंत्रशिक्षण विभागाकडे १२ हजाराच्या जवळपास आर्ज प्राप्त झाले हाेते. आता पुन्हा ऑनलाईन अर्जासाठी मुदवाढ दिल्याने विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे.
अशी आहे प्रक्रिया
- १८ जुलै : ऑनलाईन नाेंदणी, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलाेड करणे. कागदपत्रांची पडताळणी व अर्ज भरल्याची निश्चिती करणे.
- २० जुलै : तात्पुरती गुणवत्ता यादी प्रकाशित करणे.
- २१ ते २३ जुलै : प्राथमिक यादीवरील तक्रारी, आक्षेप नाेंदविणे.
- २५ जुलै : संकेतस्थळावर अंतिम यादी प्रकाशित करणे.
- २५ जुलै : प्रवर्गनिहाय उपलब्ध जागा प्रदर्शित करून प्रवेशाच्या पहिल्या फेरीला सुरुवात.
- २६ ते २९ जुलै : विद्यार्थ्यांनी त्यांच्या लाॅगीनमधून अभ्यासक्रम व संस्थेचा पसंतीक्रम नाेंदविणे.
- ३१ जुलै : संस्था व अभ्यासक्रम दर्शविणारे जागा वाटप प्रदर्शित करणे.
- १ ते ६ ऑगस्ट : वाटप करण्यात आलेल्या जागेची विद्यार्थ्यांनी आपल्या लाॅगीनमधून स्वीकृती करणे. तसेच मिळालेल्या संस्थेमध्ये आवश्यक कागदपत्र भरून प्रवेश निश्चित करणे.
- ७ ऑगस्टपासून दुसऱ्या फेरीला सुरुवात.